Dilip Walse Patil : महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि २३ नोव्हेंबर या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. खरं तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार आहे. या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. सध्या राज्यभरात विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून जनतेला मोठी आश्वासनही देण्यात येत आहेत. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचंही पाहायला मिळत आहे.
यातच एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपलंच सरकार सत्तेत येईल असा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून आपलंच सरकार येईल असा दावा करण्यात येते आहे. मात्र, असं असलं तरी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात राजकीय समीकरण बदलणार का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी एक सूचक भाष्य केलं आहे. “कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून येतात? हे महत्वाचं असून खरं गणित निकालानंतर सुरु होईल. मग काही गणितं बदलतील”, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?
“विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून येतात? हे महत्वाचं आहे. त्यानंतर खरं गणित सुरु होईल. मग निवणुकीनंतर त्यामध्ये काही गणितं बदलतील देखील. हे मी जनरल सांगत असून कोणते संकेत नाहीत. मात्र, समजा कोणतं गणित नाही बसलं तर सरकार स्थापन करण्यासाठी गणित करावं तर लागेल ना? काही ना काही तर करावं लागले ना? सहा प्रमुख पक्ष आहेत, दोन आणि तीन नाहीत. त्यामुळे सहा पक्षात गणित करायला भरपूर वाव आहे”, असं सूचक विधान दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी एका मुलाखतीत बोलताना राज्याच्या राजकारणाबाबत सूचक भाष्य केलं होतं. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे संपर्कात असल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. तसेत निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी देखील सरकार स्थापन करण्यासाठी काही गणित करावं लागेल, असं सूचक विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.