Manikrao Kokate : विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आणि खातेवाटपही करण्यात आलं. मात्र, सरकार स्थापन होऊन एक महिना होऊन गेला तरी अद्याप पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आलेलं नाही. यातच महायुतीच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेण्याचं आव्हान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे.

दरम्यान, पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? पालकमंत्री पदाचे वाटप का रखडले? पालकमंत्री पदाच्या वाटपाला उशीर का लागतोय? यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं भाष्य केलं आहे. आता पालकमंत्री पदाच्या वाटपाबाबतचा निर्णय २६ जानेवारीपर्यंत घ्यावाच लागणार असल्याचंही माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान

माणिकराव कोकाटे काय म्हणाले?

पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? असा प्रश्न माणिकराव कोकाटे यांना विचारला असता ते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती आहे. पालकमंत्री पदाचे पाटप करण्यासाठी कुठेही उशीर झालेला नाही, अजून वेळ आहे. तसेच अजून जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी बजेट पब्लिश होणं, बजेटमधून पैसे येणं आणि त्यानंतर कामे मंजूर होणं, अशा अनेक गोष्टी बाकी आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदाचे वाटप करण्यासाठी उशीर झाला आहे असं मला वाटत नाही. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच याबाबत निर्णय घेतील”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.

पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार?

माणिकराव कोकाटे यांना माध्यमांशी बोलताना पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? २६ जानेवारीपर्यंत याबाबतचा निर्णय होईल का? असं विचारलं असता माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, “२६ जानेवारीपर्यंत पालकमंत्री पदाच्या वाटपाबाबतचा निर्णय घ्यावाच लागेल.” दरम्यान, आता महायुतीमधील कोणत्या पक्षाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळतं आणि कोणत्या मंत्र्यांना कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळते? हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Story img Loader