महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्वच नेते मंडळींनी मतदारसंघात दौरे वाढवले असून कामांचा आढावा घेण्यात येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशी चुरस या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. काही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमने सामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गटाने दंड थोपडले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढवली जाईन, असं सांगितलं. त्यामुळे एक प्रकारे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अजित पवार गटाने थेट आव्हान दिल्याची चर्चा आता रंगली आहे.
हेही वाचा : इंग्रजीतून शपथ घेत निलेश लंकेंचं सुजय विखेंना प्रत्युत्तर; शरद पवारांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले…
नजीब मुल्ला काय म्हणाले?
“गेल्या पंधरा वर्षांपासून मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. तसेच घड्याळ चिन्हावरच येथे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता विधासभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार आहे. आज आम्ही यासंदर्भात स्पष्ट करत आहोत की, पक्ष जो उमेदवार देईन त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणणार आहोत”, असं नजीब मुल्ला यांनी सांगितलं. तसेच नजीब मुल्ला यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. ‘मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या बाबतीत आजपर्यंत जे खोटे बोलत आले, त्याबाबत आता आम्ही सत्य परिस्थिती सर्वासमोर आणणार आहोत. मतदारसंघात काय विकास झाला? ही सत्य परिस्थिती आम्ही जनतेच्या समोर आणणार आहोत. उमेदवाराची घोषणा कधीही होऊ द्या. मात्र, कामाची सुरुवात झाली आहे’, असं नजीब मुल्ला यांनी म्हटलं.
आनंद परांजपे काय म्हणाले?
मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाची एक प्रणाली असते. उमेदवाराबाबत पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेत असतं. त्यामध्ये इच्छुक उमेदवाराला बोलवलं जातं. याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेत असतात. मात्र, मी तुम्हाला विश्वास देतो की येथील उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरच लढेल. पक्ष जो उमेदवार देईन, त्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम आम्ही करू, असं आनंद परांजपे म्हणाले आहेत.