Narhari Zirwal On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे २१०० रुपये कधी मिळणार? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठं विधान केलं आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलंच नाही, असं झिरवळ म्हणाले आहेत. तसेच लाडक्या बहिणी या १५०० रुपयांमध्ये खूश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मंत्री नरहरी झिरवळ काय म्हणाले?
लाडक्या बहिणी नाराज आहेत, कारण त्यांना २१०० ऐवजी १५०० रुपयेच मिळत आहेत. तेही नियमित मिळत नाहीत, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत मंत्री नरहरी झिरवळ यांना विचारला. यावर बोलताना मंत्री झिरवळ यांनी म्हटलं की, “लाडक्या बहिणी नाराज आहेत, हे आपण सांगत असता किंवा विरोधक सांगत असतात. पण सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं कोणीही जाहीर केलेलं नाही”, असं मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.
‘लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश’
“विरोधकांनी आधी म्हटलं की महायुती लाडक्या बहिणींना १५०० रुपये देणार नाही. कारण त्यांच्याकडे १५०० रुपये देण्याची ऐपत नाही अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी म्हटलं की २१०० रुपये देणार आणि मग १५०० रुपये दिले नाहीत तर २१०० कसे देणार? अशी टीका केली. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले तर आता २१०० रुपये देण्यावर विरोधक जोर देत आहेत. मात्र, असा काही प्रकार नाही. लाडक्या बहिणींना १५०० रुपये देखील परिपूर्ण आहेत. लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत”, असं मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?
दरम्यान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? याबाबत नुकतीच माहिती दिलेली आहे. आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की, “एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरीत केला जाणार आहे.” दरम्यान, आदिती तटकरे यांनी यासंदर्भात कोणतीही थेट तारीख दिली नसून आता महिना संपण्यास अवघे काही दिवस उरलेले असताना सरकारकडून पात्र महिलांना हे पैसे कधी मिळणार याबाबत चर्चेला जोर आला आहे. तसेच काही वृत्तांनुसार, अक्षय तृतीयेला हा निधी वितरीत केला जाणार असल्याची चर्चा आहे.