राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै २०२३ नंतर उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. नुकताच शरद पवार गटाचा एक मेळावा शिर्डीत पार पडला. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी होता असा उल्लेख केला. मात्र शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांचं समर्थनही केलं नाही आणि त्यांचा उल्लेखही केला नाही. ज्यानंतर जितेंद्र आव्हाड पक्षात एकटे पडल्याची चर्चा सुरु झाली. याविषयी सुनील तटकरेंनी आता भाष्य केलं आहे.
काय म्हणाले सुनील तटकरे?
शरद पवार गटात जितेंद्र आव्हाड एकटे पडले आहेत का? असा प्रश्न विचारला असता सुनील तटकरे म्हणाले, “ही तर सुरुवात आहे. आमच्या पक्षात अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात आमचा पक्ष उत्तम काम करतोय, दमदार काम करतो आहे. शरद पवार गटात काय चाललंय त्याबाबत मी मत व्यक्त करणं चुकीचं ठरेल. मला त्याविषयी काहीही मतप्रदर्शन करायचं नाही. आम्ही आमचा निर्णय एका विचाराने घेतला आहे. दीर्घकाळ आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांनी घेतला आहे. अजित पवार यांचं नेतृत्व सर्वस्पर्शी असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आमचा हा निर्णय मान्य आहे असं मला वाटतं.” असं उत्तर सुनील तटकरेंनी दिलं आहे.
जागावाटपाबाबत काय म्हणाले सुनील तटकरे?
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं उदीष्ट ठाम आहे की महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा लोकसभेत जिंकायच्या आहेत. कुणी कुठल्याही मतदारसंघात गेलं तरीही त्या ठिकाणी पक्षाचा विचार न करता महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करायला गेले आहेत असं वृत्तांकन करा असं सुनील तटकरे पत्रकारांना म्हणाले आहेत. राज्यपातळीवर जे आमच्या तिन्ही पक्षातले मतदारसंघ आहेत तिथल्या नेत्यांना आपल्याकडे उमेदवारी यावी हे वाटणं अगदीच साहजिक आहे. मात्र महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होईल आणि दिल्लीत त्याविषयीचा अंतिम निर्णय होईल असंही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.
जागावाटपासाठी महायुतीतले तिन्ही प्रमुख पक्ष बैठक घेतील. त्यावेळी एक उद्दीष्ट आमच्यासमोर आहे ते म्हणजे लोकसभेत ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणं. आम्हाला त्या जागा जिंकणं हे आमचं लक्ष्य आहे. बाकी कुठल्या गटात काय सुरु आहे त्यावर भाष्य करणार नाही असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.