Narhari Zirwal On Sharad Pawar : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. तसेच खातेवाटपही करण्यात आलं. मात्र, यानंतरही अद्याप महायुतीच्या काही मंत्र्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, अशीही इच्छा व्यक्त केली. तसेच मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. “शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेल्यापासून आजपर्यंत शरद पवारांची भेट घेतली नाही. पण आता शरद पवारांना भेटून लोटांगण घालून पाया पडणार आहे”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे.
नरहरी झिरवाळ काय म्हणाले?
“आज मी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. आज मी खूप आनंदी आहे, माझ्याबद्दल जनतेने ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्या अपेक्षेप्रमाणे माझ्या नेत्यांनी अन्न व औषध प्रशासन हे खातं दिलं. मंत्रिपद मिळण्यास उशीर झालेला नाही. शेवटी राज्य आहे, त्यामुळे अनेकांना अपेक्षा असतात. माझ्यासारखा नशीबवान मीच आहे. कारण मला थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. मी आधी उपाध्यक्ष झालो, आता मंत्रीही झालो”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं.
शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत यासाठी आशाताई पवार यांनी विठूरायाला साकडं घातलं आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं की, “माझी देखील अशीच भावना आहे. प्रत्येक माणूस एकच मागणी करतो, मग तो विरोधात असो किंवा राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील असो. प्रत्येकाला हेच वाटतं की दोन्ही पवार हे एकत्र असले पाहिजेत. कारण शरद पवार यांचा एवढ्या दिवसांचा अनुभव पाहता सर्वांना हेच वाटतं”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
‘…म्हणून दोन्ही पवारांनी एकत्र यावं’
“आता राजकारणात काही गोष्टी घडत असतात आणि त्या घडून गेल्या आहेत. आम्ही देखील चूक केली असं म्हणा किंवा बरोबर केलं असंही म्हणता येईल. मात्र, आम्हाला विश्वास होता की आम्ही शरद पवारांना सोडून गेलं तर ते आम्हाला वेगळं समजणार नाहीत, म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. जनतेनेही मला पुन्हा एकदा आमदार केलं. शरद पवार हे सर्वसामान्याचे नेते आहेत. त्यामुळे ते निक्कीच याबाबत विचार करतील. तसेच जी चाललेली हेळसांड आहे, हेळसांड कशी तर हे सांगतो की, जेव्हा अजित पवारांनी पहाटे शपथ घेतली होती, तेव्हा मी दिल्लीला गेलो होतो. तेव्हा बोलताना मी म्हटलं होतं की मी शरद पवारांबरोबर आहे. जर माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील, असं म्हटलं. मात्र, काही लोकांनी याचा गैरप्रचार केला. खरं तर प्रचार हा प्रचार असतो. मी शरद पवारांच्या किती जवळ होतो हे सांगायचं झालं तर मी जेव्हापासून शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेलो, तेव्हापासून आजपर्यंत शरद पवारांना भेटलेलो नाही. याचं कारण कोणत्या तोंडाने शरद पवारांच्या समोर जायचं? एवढ्या दिवस गेलो नाही. मात्र, आता शरद पवारांकडे जाणार आणि लोटांगण घालून पाया पडणार आणि म्हणणार साहेब काहीही करा पण आमच्या सारखे अनेक आहेत, ज्यांना अडचण झालेली आहे म्हणून एकत्र या”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं.