राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते आतापासून तयारीला लागले असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते मतदारसंघाचा आढावा घेताना दिसत आहेत. यासाठी बैठकांचा धडाकाही सुरु आहे. मात्र, असं असतानाच महायुतीमधील आमदारांमध्ये निधीवाटपावरून धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे मंत्री कुणाचंही काम करत नाहीत. मंत्र्यांनो आता तरी सुधरा, लोकाभिमुख काम करा. जर कुणी नखरे केले आणि निधीवाटपावरून फाईल अडवण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावर यावं लागेल, असा इशारा देत आमदार माणिकराव कोकाटे यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या आरोपामुळे महायुतीत धुसफूस सुरु आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : “अनिल देशमुख यांच्यावर आत्महत्या करायची वेळ आली होती, कारण..”; श्याम मानव यांचा मोठा दावा
माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
“मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदारांच्या निधीवाटपाबाबत काय चर्चा झाली? याबाबत मला माहिती नाही. पण निधीवाटपावरून वाद झालेला नाही. कारण अजित पवार यांनी आमदारांना कधीही निधी कमी पडू दिलेला नाही. पण काही मंत्री महोदय जबाबदारीने काम करत नाहीत. ते त्यांच्याच अविर्भावात असतात”, अशी टीका माणिकराव कोकाटे यांनी केली.
कोकाटे पुढे म्हणाले, “मी अजित पवार यांच्याबरोबर बोललो आहे की, वेगवेगळ्या पक्षाचे जे मंत्री आहेत. हे मंत्री कोणाचंही काम व्यवस्थित करत नाहीत. ते काहीही समजून घेत नाहीत. त्यांच्यामध्येच स्पर्धा चालली असून मंत्र्यांचं काय चाललंय? हे मंत्र्यांनाच माहिती नाही. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांची वेगवेगळी बैठक घ्यावी. ज्या-ज्या आमदारांचे काम बाकी राहिले त्या आमदारांच्या कामाला हो किंवा नाही हे लवकर स्पष्ट करावं”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.
“आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. जर मंत्र्यांनी असे नखरे केले आणि एकमेकांना भांडले, एकमेकांच्या फाईल आडवण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचाच भविष्यकाळ वाईट आहे. आम्ही तर मंत्रिमंडळात नाहीत, मग आम्हाला तर काहीच मिळणार नाही. आम्हाला तर रस्त्यावर यावं लागेल. त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी अजूनही सुधरावं आणि लोकाभिमुख काम करावं. आमदारांचे जे काम आहेत, त्यांना बोलून त्यांचं काम करावीत. तुम्हाला मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे तर त्याचं सोनं केलं पाहिजे. पण संधीच सोनं करताना मंत्री दिसत नाहीत, फक्त राजकारण करताना दिसत आहेत”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी केला आहे.