लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या सुरू आहे.या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात घडलेल्या राजकीय घडामोडीसंदर्भात अनेक नेते गौप्यस्फोट करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत लोकांमध्ये सहानुभूती असल्याची चर्चा सुरु असते. यावर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते, खासदार सुनील तटकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
“२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीपेक्षा २०२४ ची निवडणूक वेगळी होती. कारण त्या निवडणुका भारतीय जनता पक्ष, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा झाल्या. आता २०२४ च्या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. २०१९ ते २०२४ या काळात राज्यात जे स्थित्यंतरे झाली. पण २०१९ मध्ये भाजपा आणि शिवसेना युतीला कौल मिळाला होता. तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतील, असं वातावरण होतं. मात्र, भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वाद झाले. त्यानंतर महाराष्ट्राच राजकारण झपाट्याने बदललं, असं सुनील तटकरे म्हणाले. ते एपीबी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
सुनील तटकरे पुढे म्हणाले, “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर २०१९ ते २०२४ या काळात जे बदल होत गेले याची सुरुवात २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर झाली. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही कुरुबुरी सुरु होत्या”, असंही तटकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा : “तेव्हापासून ही बाई हवेत उडू लागली आहे”, सुषमा अंधारेंच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचा हल्लाबोल
राष्ट्रवादीला उमेदवार आयात का करावे लागले?
“सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार आयात केले आहेत. २०१९ साली देखील अनेक पक्षात उमेदवार आयात केलेले पाहायला मिळाले होते. एक गोष्ट खरी आहे की, आम्हाला लोकसभेला कमी जागा आहेत. मात्र, आम्ही एका जागेवरून सातपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्वजण म्हणजे महायुतीतील मित्र पक्ष ताकदीने उतरलो आहोत. या निवडणुकीत थोडसं वातावरण वेगळं आणि टफ आहे. कारण २०१९ ते २०२४ मध्ये घडलेले सर्व राजकारण महाराष्ट्रासाठी नवीन आहे. याची सुरुवात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा झाली होती”, असं सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितलं.
“राष्ट्रवादी अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेतल्यानंतर मला कोणीही प्रतिप्रश्न केला नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असते. त्यामुळे स्वभाविक यासंदर्भात प्रश्न सर्वांना विचारले जाऊ शकतात. ज्या शिवसेनेमुळे आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो नाहीत, त्या शिवसेनेबरोबर आज राष्ट्रवादी (शरद पवार गट) आघाडीत आहे. त्यामुळे वेगळी भूमिका फक्त आम्हीच घेतो आहोत, असा काही प्रश्न नाही”, असं स्पष्टीकरणही सुनील तटकरे यांनी दिलं.
महाविकास आघाडीबाबत सहानुभूती आहे का?
महाविकास आघाडीबाबत सहानुभूती असल्याच्या चर्चांवर सुनील तटकरे म्हणाले, “महाविकास आघाडीबाबत सहानुभूती आहे, असं एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसं पाहिलं तर राजकारणातील बदल कशामुळे झाले? सहानुभूती आहे असे जर आपण म्हणत असू तर २०१९ ला मिळालेला कौल जर मानला गेला असता तर हे स्थित्यंतरे झाली असती का? नसती झाली”, असं सुनील तटकरे यावेळी म्हणाले.