Nawab Malik : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. तसेच निवडणुकीच्या आधीची महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपलंच सरकार सत्तेत येईल, असा दावा करण्यात येत आहे.
असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘निवडणुकीनंतर आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार चालणार नाही’, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधनामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
नवाब मलिक काय म्हणाले?
“मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात निवडणूक लढवत नाही. कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात प्रचार करत नाही. महायुती माझ्याविरोधात लढत आहे. भाजपाचे लोक माझ्या विरोधात आहेत, तरी मी ही निवडणूक लढवत आहे. कारण मला लोकांनी आग्रह केला की निवडणूक लढवावी. आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष असेल. मात्र, आम्ही आमची कोणतीही विचारधारा सोडलेली नाही. आम्ही आमच्या विचारधारेशी बांधील आहोत. आम्ही आमची विचारधारा कधीही सोडणार नाही. मी वारंवार सांगतो की, अजित पवार किंगमेकर ठरणार आहेत. यापुढे जे काही सरकार निर्माण होईल, त्यामध्ये किमान समान कार्यक्रम ठरेल. चंद्राबाबू नायडू यांच्यासारखी आमची ताकद राहणार आहे. एखादा वादाचा विषय असेल तर त्यापासून लांब राहण्याचा आमचा आग्रह असेल”, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीनंतर दोन्ही पवार एकत्र यावे का?
विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं असं वाटतं का? या प्रश्नावर बोलताना नवाब मलिक यांनी म्हटलं की, “लोकांची इच्छा आहे की असं घडलं पाहिजे. मात्र, ते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत हे शक्य नाही. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी हे मान्य केलं की सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार देणं चूक होती. आता या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार हे बारामतीमधून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील”, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
“‘बंटेंगे तो कटेंगे’ या स्लोगनमुळे भारतीय जनता पार्टीचं मोठं नुकसान होणार आहे. या देशात सर्वांनी एक राहिलं पाहिजे ही आमची विचारधारा आहे. मात्र, लोकांनी या वाह्यात गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या कोणत्याही घोषणांचा फायदा होणार नाही. मी निवडून आल्यानंतर महायुतीला काही अटींवर माझा पाठिंबा राहील. जर काही चुकीचं होत असेल तर मी विरोधात राहील तसेच चांगल्या गोष्टीबाबत पाठिंबा असेल. मात्र, काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर आमचा पक्ष त्यांना पाठिंबा देणार नाही. आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार चालणार नाही”, असं मोठं विधान नवाब मलिक यांनी केलं आहे.