Sunil Tatkare on Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सर्व पक्षाच्या नेत्यांचे महाराष्ट्रात सध्या दौरे सुरु आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. असं असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीबाबत मोठं विधान केलं. “मी ७-८ वेळा निवडणूक लढलो, आता मला रस राहिला नाही. तसेच जय पवार यांच्या उमेदवारीबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल”, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या त्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “अजित पवारांनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्या भावना त्यांनी नाही तर त्यांना प्रश्न विचारला गेल्यानंतर व्यक्त केल्या आहेत. मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करेन”, असं सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी म्हटलं आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
“अजित पवारांनी तसं विधान केलेलं नाही. विनाकारण त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. आगामी विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वातच लढणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीला समोरं जाणार आहोत. पक्षाला जास्तीत जास्त यश कसं मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्यावेळी सेनापतीच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढत असतो, तेव्हा ते स्वभाविकच निवडणुकीच्या रिंगणात असतील. यामध्ये कोणाच्याही मनात काही दुमत असण्याचं कारण नाही. अजित पवारांनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे”, असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं.
हेही वाचा : ‘बारामतीमधून निवडणूक लढवण्यात रस नाही’, मुलगा जय पवारच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं मोठं विधान
अजित पवार यांनी बारामती विधानसभेबाबत केलेल्या विधानानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले, “विरोधकांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. याचं कारण लाडकी बहीण योजना गावागावात आणि घराघरांमध्ये पोहोचली आहे. याबाबत एक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात तयार झालं आहे. ८ ऑगस्टपासून आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहोत. आम्ही अजित पवारांच्याच नेतृत्वात या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत”, असंही सुनील तटकरे यांनी सांगितलं.
बारामतीकरांचा विश्वास
“अजित पवारांनी (Ajit Pawar) ज्या भावना व्यक्त केल्या, त्या भावना त्यांनी नाही तर त्यांना प्रश्न विचारला गेल्यानंतर व्यक्त केल्या आहेत. त्यांनी स्वत: ते विधान केलेलं नाही. जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी होत असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्हाला वाटतं की आम्ही त्यांच्याच नेतृत्वात निवडणुकीला सामोर जाणार आहोत. त्यामुळे ते देखील निवडणुकीत उमेदवार असणारच आहेत. बारामतीकरांचा विश्वास त्यांच्यावर आहे. गेल्या ३५ वर्षात बारामतीचा चेहरामोहरा बदलण्यात अजित पवारांचा मोलाचा वाटा आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd