Chhagan Bhujbal meets Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी अचानक शरद पवार यांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. भुजबळ सकाळी शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले. ही भेट पूर्वनियोजित नसल्यामुळे शरद पवारांची भेट होण्यासाठी त्यांना काही तास ताटकळत बसावे लागले. यानंतर अजित पवारा गटासह भाजपा आणि इतर पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही याबद्दल भूमिका व्यक्त केली असून छगन भुजबळ यांच्या भेटीची पूर्वकल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

सुनील तटकरे काय म्हणाले?

दरम्यान माध्यमांशी बोलत असताना सुनील तटकरे म्हणाले की, भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर पवारांच्या भेटीमागचे कारण जाणून घेईल. भूजबळ ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे ते कुणाला भेटायला जात असताना आमची कुणाची परवानगी घ्यायची त्यांना गरज नाही. अजित पवार गटात भुजबळ नाराज नाहीत. काल तर बारामतीच्या जन सन्मान मेळाव्यात त्यांनी उस्फुर्तपणे भाषण केले. त्यामुळे भुजबळ यांच्याबाबतीत निराधार वृत्त पसरवू नये.

हे वाचा >> बारामतीच्या जनसन्मान सभेत भुजबळ यांचा आरोप; आरक्षणावरून भांडणे लावण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट तिसरी आघाडी स्थापन करणार का? अशी चर्चा असल्याचा प्रश्न विचारताच सुनील तटकरे यांनी ही चर्चा फेटाळून लावली. या सर्व कपोलकल्पित बातम्या असल्याचे ते म्हणाले.

रविवारी १४ जुलै रोजी बारामतीमध्ये अजित पवार गटाचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या विरोधात भूमिका मांडली होती.

दरम्यान अजित पवार यांनाही माध्यमांनी या भेटीबद्दल विचारणा केली. मात्र त्यांनी माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

काल टीका आज भेट

बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जनसन्मान सभे’मध्ये भाषण करत असताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “आरक्षणाबाबत सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वजण येणार होते. मात्र आयत्या वेळी बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला”, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता.

आरक्षणावरून सुरू असलेल्या मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. ‘आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्याऐवजी विरोधकांना काही तरी सल्ले देऊन महाराष्ट्र पेटविण्याचे काम केले जात आहे,’ असा आरोप भुजबळ यांनी केला. ते म्हणाले, “सर्वक्षीय बैठकीला विरोधी पक्षनेेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांना बोलावले होते. बैठकीला शरद पवार यांनीही यावे, अशी विनंती आव्हाड यांना केली होती. ज्या वेळेस असे प्रश्न निर्माण होतात, त्या वेळी ज्येष्ठ नेते म्हणून पवार यांनीही यायला हवे होते, असे भुजबळ म्हणाले. निवडणुकीत तुम्ही तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची भूमिका मांडू. पण, सामाजिक प्रश्न पेटत असताना तुम्ही मुद्दाम शांत का बसता आहात”, असा सवाल त्यांनी केला.