लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्यांच्या मुंबईत बैठकांचा धडाका सुरू आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मोठं विधान केलं आहे. “अनेकजण अजित पवार आणि आमच्या संपर्कात आहेत”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे हे निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव केला आहे. बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून शरद पवार गटाच्या उमेदवाराने विजयाची तुतारी तिथे फुंकली. या मतदारसंघातून निवडून आलेले बजरंग सोनवणे आता अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं विधान अमोल मिटकरी यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर सुनील तटकरे यांनीही भाष्य करत सूचक विधान केलं आहे.
हेही वाचा : शरद पवार शाकाहारी की मांसाहारी? जैन मुनींच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, “मी गेल्या एक वर्षापासून…”
सुनील तटकरे काय म्हणाले?
“आमच्या पक्षाचा वर्धापन दिन झाला. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सर्वांना सूचना केल्या. मात्र, छगन भुजबळ यांना सूचना केल्या नाही, कारण पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पक्षाच्या प्रवक्त्यांनी किंवा अन्य मंत्री महोदयांनी विधानसभेच्या जागा वाटपाच्या दृष्टीने कोणीही चर्चा करू नये, असं म्हटलं. मात्र, छगन भुजबळांना तो अधिकार असून त्यांच्याबाबत मी काहीही बोलणार नाही”, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.
ते पुढं म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी जे सांगितलं त्याचा अर्थ आम्ही जी भूमिका मांडत आलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये जाण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाची सहमती होती. याला जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांसमोर केलेल्या भाषणात शिक्कामोर्तब केलं”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
सुनील तटकरे सोनवणेंबाबत काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. यावर सुनील तटकरे यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “अमोल मिटकरी जे काही बोलले आहेत. कारण त्यांच्याकडे काही माहिती असेल. पण मी पक्षाच्या कामामध्ये व्यस्त होतो. त्यामुळे याबाबत मी माहिती घेऊन. मात्र, एक नक्की आहे की अनेकजण अजित पवार आणि आमच्या संपर्कात आहेत”, असं सूचक विधान सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.