Sunil Tatkare on Chief Minister Decision : राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? हा एकमेव प्रश्न राज्यात सर्वाधिक विचारला जात आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाल्याने सरकार स्थापन होण्यासही अडचणी येत आहेत. दरम्यान, यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची काय भूमिका आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे. याबाबत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज टीव्ही ९ शी संवाद साधला.
“महायुतीला महाराष्ट्रातील जनतेले यश दिलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात काँग्रेसला सर्वाधिक जास्त बहुमत मिळत होतं, यापेक्षाही जास्त मत महायुतीला मिळालं आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय एक दोन दिवसांत येणं अपेक्षित आहे. तो निर्णय झाला की राज्य सरकार स्थापन होईल. ज्या गतीने अडीच वर्षांत महायुती सरकारने काम केलंय तेवढ्याच गतीने महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल”, असं सुनील तटकरे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे का?
“मुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्या ठिकाणी आहेत. त्यांच्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील”, असं सुनील तटकरे म्हणाले.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला होता का?
“महायुतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. जे काही ठरेल ते एक दोन दिवसात ठरेल, असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं.
मंत्रिपदाचं वाटप ठरलं का?
“यासंदर्भातील निर्णय भाजपाच्या पक्षश्रेष्ठींबरोबर बसून इतर घटकपक्ष घेतील. मंत्रिपदाच्या संख्येबाबतही निर्णय या बैठकीत होईल.
दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा आहे. अनेक आमदार मुंबईत आले असून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी गाठीभेटी वाढल्या आहेत. मागच्यावेळी हुकलेली संधी यंदा तरी मिळणार का? याबाबत अनेक आमदारांना शंका आहे. छगन भुजबळ, सुहास कांदेंसह अनेकांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. तसंच, मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचेही वृत्त आहे. फक्त त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे.