राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सोलापूरचा गड नगरपालिका निवडणुकीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर लक्ष घालूनही राष्ट्रवादीला मानहानी सहन करावी लागली आहे.
राज्यात अजित पवार यांचे नेतृत्व प्रस्थापित होण्यापूर्वी सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अकलूजचे वजनदार नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची ताकद होती. पवार व मोहिते यांच्यात फारसे सख्य नसले तरी त्यातून पक्षाला काही मोठे परिणाम भोगावे लागले नव्हते. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा दूध संघ, बहुसंख्य साखर कारखाने आदी माध्यमातून पक्षाची स्थिती संतुलित होती. जिल्ह्य़ात ग्रामीण भागात पक्षाची मजबूत पकड होती, परंतु अजित पवार यांनी स्वत:ची ताकद निर्माण करताना मोहिते-पाटील यांचे महत्त्व पद्धतशीर कमी केले आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यातून जिल्ह्य़ाचे नेते म्हणून संजय शिंदे, दीपक साळुंखे, प्रशांत परिचारक हे भक्कम झाले. या वाटचालीत मोहिते पाटील यांचे महत्त्व पद्धतशीरपणे कमी केले गेले. परिणामी, पक्षात बेदिली वाढली. त्याचा पहिला फटका सोलापूर जिल्हा परिषदेत पक्षाचा अधिकृत उमेदवार देऊनही सभापतीचा झालेल्या पराभवावेळी बसला. पण याकडे अजित पवार यांनी दुर्लक्ष करीत अप्रत्यक्ष प्रोत्साहनच दिले.
अजित पवार यांनी ज्यांना मोठे केले, तीच मंडळी त्यांची साथ सोडून महायुतीत गेली. प्रशांत परिचारक तर भाजपच्या वतीने विधान परिषदेवर निवडून गेले. मोहिते-पाटील गटाने पक्षात राहूनही अजित पवारांपासून चार हात दूर राहणे पसंत केले आहे. या पाश्र्वभूमीवर पक्ष सावरण्यासाठी अजित पवार यांनी राज्यात सर्वाधिक लक्ष सोलापूरकडे दिले.
गेल्या दीड महिन्यात त्यांनी जिल्ह्य़ात तब्बल ३६ मेळावे व बैठका घेतल्या. कोणत्याही परिस्थितीत नगरपालिकांसह आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व सोलापूर महापालिका निवडणुका जिंकण्याचे ‘लक्ष्य’ निश्चित केले असताना मोहिते-पाटील गट पवार यांच्यापासून दूरच राहिला. यात पवार यांनी पूर्वी पक्षात जो विस्कळीतपणा आणला, तो त्यांनीच निस्तरावा, अशी मोहिते-पाटील यांची अघोषित भूमिका होती. नगरपालिका निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी पायाला भिंगरी लावून प्रचार केला तरी बार्शीसारखी मोठी सत्ता हातातून निसटली. पंढरपूर व माढा येथे तर पक्षाचे अस्तित्वच शून्य राहिले. राष्ट्रवादीचा मजबूत गड असलेल्या माढा भागात कुर्डूवाडीत राष्ट्रवादीऐवजी स्वाभिमानी शेतकरी आघाडीची ताकद वाढली. राष्ट्रवादीचे वजनदार आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू असलेले व दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘अजितनिष्ठ’ असलेले संजय शिंदे हे स्वाभिमानी शेतकरी आघाडीच्या माध्यमातून मोठे होत असताना राष्ट्रवादीने त्यांना शत्रू कसे मानले नाही व कुर्डूवाडीत केवळ औपचारिकता कशी दाखवली, हा राजकीयदृष्टय़ा संशोधनाचा विषय ठरला आहे. पक्षात वाढलेल्या बेदिलीमुळेच सोलापूरचा बालेकिल्ला ढासळत गेला. हा पराभव राष्ट्रवादीचा असला तरी त्यातील पराभव हा अजित पवार यांचा आहे. जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जात असताना पुरता नामशेष झालेला हा पक्ष पुन्हा कसा सावरतोय हे पाहण्यासारखे आहे.
- गेल्या दीड महिन्यात त्यांनी जिल्ह्य़ात तब्बल ३६ मेळावे व बैठका घेतल्या. कोणत्याही परिस्थितीत नगरपालिकांसह आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व सोलापूर महापालिका निवडणुका जिंकण्याचे ‘लक्ष्य’ निश्चित केले असताना मोहिते-पाटील गट पवार यांच्यापासून दूरच राहिला. यात पवार यांनी पूर्वी पक्षात जो विस्कळीतपणा आणला, तो त्यांनीच निस्तरावा, अशी मोहिते-पाटील यांची अघोषित भूमिका होती.
- नगरपालिका निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी पायाला भिंगरी लावून प्रचार केला तरी बार्शीसारखी मोठी सत्ता हातातून निसटली.