सोमवारी रात्रीपासून कोकणातील बारसू येथे स्थानिकांनी रिफायनरीला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. रात्रीपासून हे आंदोलनकर्ते तिथेच बसून होतं. आज प्रकल्पस्थळाचं सर्वेक्षण केलं जाणार असून त्याला विरोध करण्यासाठी आंदोलनकर्ते एकत्र जमले. आज सकाळी पोलिसांनी त्यातल्या काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला जात असताना विधानसभा विरोधी पक्षनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.
“समृद्धी महामार्गालाही लोकांचा विरोध होता. पण चर्चा झाली त्यातून मार्ग निघाला. तशा प्रकारे या प्रकल्पाबाबत वेगवेगळं मत व्यक्त होत आहे. जे विरोध करत आहेत, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, कारणं समजून घेतली, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्यांच्या शंकेचं निरसन केलं पाहिजे. एन्रॉन प्रकल्प आणतानाही बऱ्याच जणांनी विरोध केला होता. या प्रकरणी मुस्कटदाबी होऊ नये. संमतीने जे काही व्हायचं ते व्हावं. आम्ही विकासकामाला विरोध करत नाही”, असं अजित पवार म्हणाले.
“स्थानिकांच्या विरोधात तथ्य असेल, तर…”
दरम्यान, विरोध करणाऱ्यांशी चर्चेची भूमिका सरकारने घ्यावी, असं अजित पवार म्हणाले आहेत. “राष्ट्रवादीची भूमिका विकासाची आहे. पण ते करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, भावी पिढ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्या लोकांची बाजू ऐकून घ्यावी. त्यात तथ्य असेल, तर मार्ग काढावा. तथ्य नसेल, तर समजावून सांगावं”, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर?
यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्यासंदर्भात विचारणा केली असता अजित पवार चांगलेच संतापले. “मला माहिती नाही. तुमचं नॉट रीचेबल वगैरे माझ्यापर्यंत बास झालं. बाकीचे कुठे आहेत ते मला काय विचारता?” असा सवालच त्यांनी उपस्थित केला.
“बारसू सर्व्हेक्षण रद्द करा”, अजित पवारांच्या मागणीवर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले…
नेमकं प्रकरण काय?
बारसू-सोलगाव इथल्या रिफायनरीसाठी आज सर्वेक्षण केलं जात आहे. मात्र, या रिफायनरीला काही स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. विरोध दर्शवण्यासाठी या भागात सोमवारी रात्रीच स्थानिक दाखल झाले. रात्रभर इथेच मुक्का करून आज सकाळीही स्थानिकांनी सर्वेक्षणाला असणारा विरोध कायम ठेवला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे.