महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत झालेल्या खडाजंगीनंतर जयंत पाटील यांनी केलेल्या असंवैधानिक वक्तव्यामुळे त्यांच्यावर अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. यानंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी केलेलं अजून एक विधान चर्चेत आलं आहे. “राष्ट्रवादीची शिवसेना आहे”, असं जयंत पाटील मिश्किलपणे म्हणाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. त्यासंदर्भात आता विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते जयंत पाटील?
विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यासह जयंत पाटील माध्यमांशी बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी मिश्किलपणे बोलताना जयंत पाटील यांनी “आमची शिवसेना आहे. राष्ट्रवादीची शिवसेना आहे”, असं विधान केलं. त्यावर भास्कर जाधव यांनी दिलखुलासपणे हसत दादही दिली.
या मुद्द्यावरून मनसेनं जयंत पाटील आणि शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका केली होती. “पोटातलं ओठांवर आलंच. राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली सेना. आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना – जयंत पाटील..भास्कर जाधव यांनीही मान्य केलं आहेच”, असं ट्वीट मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलं होतं. त्यावरून चर्चा सुरू झालेली असताना आता अजित पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
“विनाकारण ध चा मा करू नका!”
राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळ्याला अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांना पत्रकारांनी जयंत पाटलांच्या विधानाबाबत विचारणा केली. त्यावर अजित पवारांनी “विनाकारण ध चा मा करू नका”, अशी प्रतिक्रिया दिली.
“शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी मराठी लोकांसाठी, विशेषत: मुंबईसाठी काढलेली संघटना आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीतच शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे आणि युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे दिलं होतं. शिवाजी पार्कवर सर्व शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या साक्षीने त्यांनी हे संगितलंय. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्यातून वेगळा अर्थ अजिबात काढू नका. त्यांचा तसा अजिबात अर्थ नसेल.माझी त्यांची भेट झालेली नाही”, असं ते म्हणाले.
भास्कर जाधवांनी दुजोरा दिला, त्याचं काय?
दरम्यान, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी जयंत पाटलांच्या या विधानाला मिश्किलपणे दुजोरा दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता अशा दुजोऱ्याला महत्त्व नाही, असं ते म्हणाले. “या कुणाच्याही दुजोऱ्याला काहीही महत्त्व नाही. त्यांची शिवसेना त्यांच्यासोबत आहे. आमच्या राष्ट्रवादीचे विचार आम्ही पोहोचवतो. सगळे पक्ष आपापल्या परीने काम करत असतात. त्यामुळे तुम्ही कारण नसताना ध चा मा करण्याचा प्रयत्न करू नका. सर्व पक्ष आपापल्या परीने त्यांची विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात”, असं अजित पवार म्हणाले.