आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सोमवारी भेट होऊन चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून, वंचित महाविकास आघाडीत सहभागी होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या संमतीचीही आवश्यकता आहे. यादरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार यांनी वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता नवं राजकीय समीकरण पाहायला मिळू शकतं.

चर्चा सकारात्मक!; प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचा दावा

“जे समविचारी पक्ष येतील त्यांना सोबत घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि भाई जगताप यांना विचारणा केली. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मी आणि छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. आम्ही याबाबत सकारात्मक आहोत,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर भेट

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी या आधीच शिवसेनेबरोबर युती करण्याची वंचित आघाडीची तयारी असून, त्याबाबत प्रकाश आंबेडकर व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यात दोन बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर सोमवारी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाल्याने युतीच्या चर्चेला आणखी वेग आल्याचे मानले जाते. ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये या दोन नेत्यांची बैठक झाल्याची माहिती शिवसेनेतील सूत्राकडून देण्यात आली.

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा सकारात्मक झाली आहे. काही विषयांवर अजून चर्चा सुरू आहे. पण लवकरच अंतिम निर्णय होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार का, या प्रश्नावर त्यांची तशी तयारी असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar on prakash ambedkar uddhav thackeray mahavikas aghadi sgy