विरोधकांना आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं त्यांना वाटत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढील लक्ष्य असू शकतं असा दावा केला आहे. दरम्यान रोहित पवार यांचे काका आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रोहित पवार यांच्या दाव्यासंबंधी विचारलं असता अजित पवार यांनी सांगितलं की “रोहितला या विधानामागचा अर्थ नेमका काय आहे ते विचारतो. पण भाजपा, काँग्रेस, मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करावं”.
“अलीकडच्या काळात वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मला काही दिवसांपूर्वी किती दिवस सरकार टिकणार असा प्रश्न विचारला होता. त्यावर १४५ चा आकडा आहे तोपर्यंत हे सरकार टिकेल असं मी सांगितलं होतं. पण मी वेगळं काहीतरी बोलल्याचं सांगण्यात आलं. मला काय करायचं आहे. मला खूप काम आहे. त्यांचं त्यांना लखलाभ आणि आमचं आम्हाला,” असंही अजित पवार म्हणाले.
रोहित पवारांनी काय म्हटलं आहे?
तुमच्या आणि अजित पवारांच्या नात्यात दुरावा असल्याची चर्चा अनेकदा झाली. तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “अजित पवारांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलं. माझं लग्नही त्यांनीच ठरवलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचं असतं, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही”.
पुढे ते म्हणाले “आमची सर्वांचं उद्दिष्ट् स्पष्ट आहेत. सुप्रिया सुळेंना लोकसभेत, अजित पवारांना राज्यात आणि मला सध्या जे करत आहे तेच काम करण्याची इच्छा आहे. पण विरोधकांना ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रमाणे आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं विरोधकांना वाटत आहे. शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट असू शकतो”.