भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक विकसित केल्याचं वक्तव्य केल्याने सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नाराजी जाहीर करत टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. “कोणीही या वक्तव्याचं समर्थन करु शकत नाही. चंद्रकांत पाटील यांना इतिहासाची किती माहिती आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू समाजापुरतं मर्यादित ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही महाराज हिंदूंची व्होट बँक वाटतात, त्यामुळे भाजपाला वाटणंही स्वाभाविक आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली; वाजपेयी, मोदींनी त्यावर कळस चढवला- चंद्रकांत पाटील

“महाराजांनी स्थापन केलेलं राज्य हिंदूंचं राज्य नव्हतं, हे रयतेचं लोककल्याणकारी राज्य होतं. त्यात मुस्लीसुद्धा होते. चंद्रकांत पाटील यांना एवढं माहिती असायला हवं. पण आता राजकारणासाठी महाराजांचा सोयीनुसार वापर केला जात आहे. मागील काळात योगींची, मोदींची तुलना महाराजांशी करण्यात आली होती,” अशी आठवण करुन देत त्यांनी संताप व्यक्त केला.

“…तेव्हा पळून गेले होते”; शिवरायांनी हिंदू व्होट बँक तयार केली म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर संजय राऊत संतापले

“हे बालिशपणाचं वक्तव्य आहे. उतारवयात बुद्धी नाठी होते असं म्हणतात. हे वक्तव्य म्हणजे विनाशकाली विपरित बुद्धी आहे. या वक्तव्याची चर्चा फक्त महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नाही तर अनेक शिवप्रेमी दुखावले आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल. त्यांनी महाराजांची आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले –

“तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “अहो साहेब व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांच्या उरावर बसण्यासाठी छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करून बहुजन समाजातील लाखो मावळे तयार केले”.

संजय राऊतांची प्रतिक्रिया

“देशात हिंदू व्होट बँक आहे हा विचार सर्वात प्रथम या देशात बाळासाहेब ठाकरेंनी मांडला. कोणी कोणत्या भ्रमात आहेत माहिती नाही. अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू व्होट बँकवाले पळून गेले आणि शिवसेना, शिवसेनाप्रमुख ठाम उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला गर्व आहे हा त्याचाच एक भाग होता. आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही. आम्ही ठामपणे उभे राहतो, लढतो आणि विजय प्राप्त करतो. फक्त राजकारणासाठी, निवडणुकांच्या सोयीसाठी, मंदिरांसाठी आमंच हिंदुत्व नाही. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार यासंदर्भात ते आहेत,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Story img Loader