Dasara Melava 2022 Latest News : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा सुरू असलेल्या दोन दसरा मेळाव्यांमुळे आज मुंबईतलं आणि पर्यायाने राज्यभरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेकडूनही या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मोठ्या गर्दीचे दावेही केले जात आहेत. या मेळाव्यांमध्ये इतर मित्रपक्षातील कुणाला निमंत्रण दिलं जाईल? कोण व्यासपीठावर उपस्थित असेल? यावरूनही तर्क-वितर्क लढवले जात असताना त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी खोचक ट्वीट करत भाजपाला लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत आज शिवसेना आणि शिंदे गट असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी घडत असताना राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. दोन्ही बाजूंनी तुफान गर्दी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातली पोलीस यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झालं असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. या दोन्ही ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यातआली आहे.

दरम्यान, या मेळाव्याला भाजपाला निमंत्रण किंवा स्थान देण्यात आलं नसल्याचा टोला अमोल मिटकरींनी लगावला आहे. मिटकरींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर यासंदर्भात ट्वीट करून भाजपाला लक्ष्य केलं आहे. ‘एक मात्र खरे की दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाचा ‘केमिकल लोच्या’ झाला. ना शिंदे गटाच्या मेळाव्यात स्थान, ना पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात, ना शिवतीर्थावर’, असं मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे बावचळलेल्या अवस्थेत…”, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका; म्हणाले, “त्यांचा संयम सुटलाय!”

दशासनाची दिली उपमा!

दरम्यान, या ट्वीटमधून अमोल मिटकरींनी भाजपाला दशासनाची उपमा दिली आहे. ‘भाजपरूपी इतरांची घरे फोडणारा दशासान भविष्यात असाच मातीत मिसळणार हे नक्की’, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

एकीकडे मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं असताना दुसरीकडे बीडमध्ये भगवानगडावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.