एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या एकूण ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यापाठोपाठ शिंदे गटानं भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. अजूनही सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार प्रलंबित आहे. मात्र, या सगळ्या कालावधीमध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून बंडखोर आमदार दीपक केसरकर हे सातत्याने भूमिका मांडताना दिसत आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर देखील दीपक केसरकर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करताना दिसत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर त्यांनी केलेल्या टीकेचे पडसाद आता उमटू लागले असून या दोन्ही पक्षांमधील नेतेमंडळी त्यांना प्रत्युत्तर देऊ लागली आहेत.
शरद पवारांवर केसरकरांची टीका!
दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक शब्दांत ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेतील प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बुधवारी दिल्लीत केला. पवारांनी शिवसेना का फोडली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना यातना का दिल्या, हेही पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितले पाहिजे, असेही केसरकर म्हणाले. शिवसेनेतून नारायण राणे यांना फुटून बाहेर पडण्यासाठी पवारांनी मदत केली होती. पवारांनीच विश्वासात घेऊन मला ही माहिती दिली होती. छगन भुजबळ तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच गेले. राज ठाकरेंनाही पवारांचाच आशीर्वाद होता, असा दावाही केसरकर यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाडांचा टोला!
दरम्यान, एकीकडे केसरकरांनी ही टीका केली असताना लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केसरकरांना प्रत्युत्तर दिलं. “अहो केसरकर, किती बोलता शरद पवारांविरुद्ध? एके काळी त्यांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? २०१४ ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका”, असं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
विरोधी पक्षात राहून आम्ही चांगलं काम करू- अमोल मिटकरी
“उगीच तोंड उघडायला लावू नका”
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनंतर अमोल मिटकरींनी देखील खोचक ट्वीट करत दीपक केसरकरांना टोला लगावला आहे. “केसरकर साहेब, सध्या तुम्ही हवेत आहात. शरद पवारांवर बोलल्याने प्रसिद्धी मिळते हे तुम्ही जाणून आहात. तुमची अजित पवारांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही”, असा खोचक सल्ला देखील मिटकरींनी दिला आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून दीपक केसरकरांना विरोध होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचा विरोध केल्यामुळे राणे कुटुंबाकडून देखील दीपक केसरकरांवर टीका होऊ लागली आहे. त्यामुळे भाजपामधून देखील केसरकरांना लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.