गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे अमोल मिटकरींनी शहाजीबापूंना शिंदे गटातले जॉनी लिव्हर म्हटल्यानंतर शहाजीबापूंनीही मिटकरींना संजय राऊतांची उपमा देत टोला लगावला. या पाठोपाठ आता पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी शहाजीबापू पाटील यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “शहाजीबापूंच्या धमकीला घाबरणारा हा शेतकऱ्याचा बच्चा नाही”, असंदेखील मिटकरी एबीपीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत.
दोघांमध्ये टोलेबाजीचा कलगीतुरा!
या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांवर टोलेबाजीचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आधी मिटकरींनी पाटलांना जॉनी लिव्हरची उपमा दिली. “शहाजीबापू हे व्यक्तिमत्व म्हणजे शिंदे गटातील जॉनी लिव्हर आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस करमणूक म्हणून पाहतो. माझ्या भविष्याची चिंता त्यांनी करू नये. शिंदे गटात त्यांचा कसा कार्यक्रम वाजला आहे, याची चिंता त्यांनी करावी. स्वत:च्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं. ते महाराष्ट्राची करमणूक करणारे नवे जॉनी लिव्हर आहेत”, असं मिटकरी म्हणाले होते.
त्यावर बोलताना शहाजीबापू पाटील यांनी “अमोल मिटकरी हे राजकारणातले विचार करण्यासारखे पात्र नाहीत. आमच्याकडे एक नाऱ्या म्हणून सोंगाड्या होता. अमोल मिटकरी म्हणजे सोंगाड्या आहे. संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे त्यांची जागा आपल्याला मिळावी, म्हणून ते रोज टीव्हीवर नटून-थटून, दाढीला तेल लावून येत आहेत. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही”, असा टोला लगावला.
“अमोल मिटकरी रोज दाढीला तेल लावून…”, संजय राऊतांचं नाव घेत शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी!
“कॅबिनेट सोडा, त्यांना…”
दरम्यान, यावरून आता पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी खोचक टिप्पणी केली आहे. “शहाजीबापू हे शिंदे गटातलं करमणुकीचं पात्र आहेत. ते कुठेही गेले, की त्यांना डायलॉग म्हणायला सांगतात. मग ते म्हणतात ‘झाडी, डोंगार’ वगैरे. त्यांना शिंदे गट कवडीचीही किंमत देत नाही. इथून पुढे कॅबिनेट तर सोडा, त्यांना राज्यमंत्रीपदांमध्येही त्यांची वर्णी लागणार नाही. ते फार आततायीपणा करत आहेत”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
“माझा विचार करण्यापेक्षा तुमचं भविष्यात अस्तित्व शिल्लक राहणार आहे का याचा विचार करा. कारण सांगोल्यात लहान लहान मुलंही तुम्ही दिसल्यावर ५० खोके, झाडी वगैरे बोलत असतील, तर तुम्ही तुमचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आपला आवाका किती आहे, तेवढंच बोललं पाहिजे”, असा टोलादेखील मिटकरींनी लगावला.