गोव्यात भाजपाला मिळालेल्या यशानंतर नागपुरात या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आलं. नागपूर विमानतळ ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत रॅला काढत यावेळी सेलिब्रेशन करण्यात आलं. यानंतर मंचावर नितीन गडकरींच्या हस्ते फडणवीसांचा सत्कारदेखील करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी गडकरींनी फडणवीसांचं कौतुक करताना अनुकूल स्थितीतही पक्षाला इतक्या जागा मिळाल्या नव्हत्या असं सांगितलं.
महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले “ज्या क्षणी…”
दरम्यान भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या रोड शो तसंच सेलिब्रेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. पोर्तुगीजांनी गोवा जिंकून महाराष्ट्रात आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा महाराष्ट्र जिंकायचा इरादा कधी सफल झाला नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “पोर्तुगीजांनी गोवा जिंकून महाराष्ट्रात आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा महाराष्ट्र जिंकायचा इरादा कधी सफल झाला नाही. कारण इकडे जंजिरा, सिंधुदुर्ग असे अनेक जलदुर्ग व मजबूत आरमार “छत्रपती शिवाजी महाराजांनी” निर्माण करुन ठेवले होते”.
“महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजपा सरकार”
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा जो सत्कार, स्वागत मी स्वीकारत आहे तो मोदींच्या आणि टीम गोव्याच्या वतीने असल्याचं म्हटलं. तसंच जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. हे आपल्या लोकांनी दिलेलं प्रेम असून मोदींच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. त्याबद्दल मी आभारी आहे असंही म्हणाले.
महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजपा सरकार पहायला मिळेल असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला. “गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे,” असं फडणवीस म्हणाले.
“राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी काही म्हटलं तर लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात, याच्यात मला रस नाही. महाराष्ट्रात भाजपाचंच पूर्ण बहुमताचं सरकार मी आणणार,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
“ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजपा नंबर १ राहील आणि भाजपा आपल्या भरवशावर सरकार आणणार,” असं यावेळी फडणवीसांनी सांगितलं. नागपूर, मुंबई पालिका निवडणूक असो आम्ही नेहमी तयारच असतो असं सांगताना सध्या स्वतंत्र वाटचाल सुरु असल्याचं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात आमची शक्ती वाढलीच आहे. आगामी सर्व निवडणुकीत ही ताकद पहायला मिळेल असंही ते म्हणाले.