गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजपा पक्ष वाढला, मात्र सूडाचं राजकारण करुन त्यांच्याच मुलीचा पराभव केला. पक्ष वाढवणाऱ्यांचेच पंख छाटले जात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला आहे. जळगावमधील बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल मिटकरी काय म्हणाले –

“भाजपा पक्ष गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईवरच वाढला आहे. पण ज्या पद्धतीने त्यांच्याच मुलीचा पराभव करत सूडाचं राजकारण केलं जात आहे. हे रोहिणी खडसेंच्या लक्षात आलं, पण पंकजा मुंडेंच्या आलं नाही. त्यांच्याही लवकर लक्षात आलं पाहिजे,” असं अमोल मिटकरी म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? अमोल मिटकरींचं मोठं विधान, म्हणाले “सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर…”

“राज्यपाल १२ आमदारांची यादी लवकरच मान्य करतील. पण त्या यादीत दुर्दैवाने पंकजा मुंडेंचं नाव नाही. म्हणजेच, आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवणाऱ्या लोकांचे पक्ष छाटले जातात. रोहिणी खडसेंना हे कळलं आणि त्या लगेच राष्ट्रवादीत आल्या, आता पंकजा मुंडेंनाही याची जाणीव असेल. तुमच्या पक्षात तुम्हाला अप्रत्यक्षपणे बाजूला ठेवत आहे, हे ओळखणं गरजेचं आहे,” असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिला.

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते”

“ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल, त्या दिवशी १६ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळेल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते,” असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

शिंदे गटाच्या आमदारांवर टीका –

“अधिवेशनाच्या पायऱ्यांवर ५० खोके आणि एकदम ओके असं म्हटलं तर एवढं का लागलं? लहान मुलंदेखील ‘५० खोके एकदम ओके’ म्हणतात. त्या खोक्यांमध्ये बिस्किट, इंजेक्शन असू शकतात. शिंदे गटाचे आमदार म्हणतात आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर शिंगावर घेऊ. मग आता बैलांवर ५० खोके, एकदम ओके लिहिलं,” असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. पान टपरीवर चुना लावणारे गद्दार निघाले अशी टीकाही त्यांनी केली.

किरीट सोमय्यांची खिल्ली

अमोल मिटकरी यांनी यावेळी तोतरं बोलत भाजपा नेते किरीट सोमय्यांची खिल्ली उडवली. “प्रताप सरनाईक जेलमध्ये जातील, असं सोमय्या म्हणत होते, पण ते तर शिंदे गटात गेले. यशवंत जाधवही भाजपमाध्ये गेले. भावना गवळींनी तर शिवबंधन काढून मोदींना राखी बांधली,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp amol mitkari on bjp pankaja munde rohini khadse sgy