राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांचा त्यांनी खाज ठाकरे असा उल्लेख केला. तसंच भाजपावाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये, आम्हाला पाठ आहे असं सांगत त्यांनी स्टेजवरुनच हनुमान चालिसा म्हणून दाखवली. इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंसोबत देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांचीही नक्कल केली. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे उपस्थित होते.

धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंना ‘अर्धवटराव’ म्हटल्यानंतर मनसेने दिलं उत्तर, म्हणाले “तुमच्यासारख्या तात्या विंचूचा…”

“पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात…चांगला टाइमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोकं आणि त्यात मेंदू दिला. पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं,” असा टोला यावेळी अमोल मिटकरींना लगावला. मुस्लिमांनी हनुमान चालिसाला विरोध कधी केला? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.

“पहिलं मराठी, अमराठीवर मुद्दा घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरलं,” अशी टीका अमोल मिटकरींनी केली. “बोलताना चेहऱ्यावर काही हावभाव नाहीत. जितेंद्र आव्हाडांना नागासारखा चेहरा म्हणाले. आम्ही नागवंशीय असल्याने नागासारखे चेहरे आहेत,” असं उत्तर यावेळी त्यांनी दिलं.

शिवछत्रपतींच्या इतिहासात बनवाबनवी करुन जेम्स लेनद्वारे महाराज आणि माँ जिजाऊंची बदनामी केली गेली हे ऐतिहासिक पुराव्यासहीत यावेळी मिटकरी यांनी दाखवून दिले. हनुमान चालिसा पाठ असली पाहिजे. भाजपावाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये, आम्हाला पाठ आहे असं सांगत अमोल मिटकरी यांनी हनुमान चालिसा बोलून दाखवली. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना थांबवत हनुमान स्तोत्र म्हणण्यास सांगितलं असता त्यांनी तेदेखील म्हणून दाखवलं.

अनेक लोकं आहेत जे सकाळी टीव्ही लावला की पत्रकार परिषदेत दिसतात असं सांगत त्यांनी किरीट सोमय्यांची मिमिक्री केली. आम्हाला पण याचे व्हिडीओ लावायला लागणार आहेत. व्हिडीओ लावा असं आम्ही म्हणणार.. लाव रे तो व्हिडीओ म्हणणार नाही असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

शरद पवारांचं कौतुक वाजपेयींनी केलं होतं असं सांगत अमोल मिटकरी यांनी व्हिडीओ दाखवला, तसंच शरद पवारांची मुलाखत दाखवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नसल्याच्या राज ठाकरेंच्या आरोपालाही उत्तर दिलं.

“महाराष्ट्रात जोरजोरात बोलण्याची स्पर्धा सुरू आहे. शरद पवारांवर बोलण्यासाठी भाजपाची एक टीम तयार झाली आहे. गोवा जिकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मध्ये रोड शो केला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सत्ताबदल होणार सांगितलं. पण कोल्हापूरनंतर गप्प झाले,” असं अमोल मिटकरींनी सांगितलं.

Story img Loader