NCP Amol Mitkari on swearing-in ceremony : राज्यात महायुतीला बहुमत मिळालं असून आता महायुतीचमधील तिन्ही प्रमुख पक्षांनी मिळून राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महायुतीकडून मुख्यमंत्रिपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय? याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, अनेक वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की दिल्लीमध्ये भाजपा पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तसेच आज किंवा उद्या देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून व भाजपासह शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) २० आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी होईल. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे विधान परिषद सदस्य तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सांगितलं की आज किंवा उद्या शपथविधी होणार नाही.
अमोल मिटकरी म्हणाले, “काल आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. तसेच काल कराडच्या प्रीतीसंगमावर असताना आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी सांगितलं की ३० नोव्हेंबरपर्यंत शपथविधीची घाई नाही. त्यामुळे मला वाटत नाही आज किंवा उद्या शपथविधी होईल. माझ्या माहितीप्रमाणे ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर रोजी शपथविधी पार पडेल”. मिटकरी हे टीव्ही ९ मराठीशी फोनवरून बोलत होते.
हे ही वाचा >> ‘पिपाणी’मुळे शरद पवारांचे नऊ उमेदवार पडले? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ‘तुतारी’चं नुकसान, वाचा यादी
या एक दोन दिवसांत शपथविधी होणार नाही : मिटकरी
राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रवक्ते म्हणाले, “आमच्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार आज सकाळी ११ वाजता एकनाथ शिंदे राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवतील. तसेच पुढील काही दिवस ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील. तसेच १ डिसेंबर रोजी शपथविधी होईल. परंतु, आज किंवा उद्या या एक-दोन दिवसांत शपथविधी होणार नाही ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. कारण आम्हाला देखील अद्याप पक्षाकडून बोलावणं आलेलं नाही. आमच्या पक्षाचे आमदार व कार्यकर्त्यांना शपथविधीच्या कार्यक्रमासाठी अद्याप बोलावणं आलेलं नाही. आम्ही सध्या घरीच आहोत त्यामुळे आज आणि उद्या शपथविधी होईल असं मला तरी वाटत नाही”.
हे ही वाचा >> Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात दाखल; राजीनामा देणार?
१ डिसेंबर ही तारीख ठरली आहे : मिटकरी
मुख्यमंत्रिपद व शपथविधीसंदर्भात अधिकृत घोषणा कधी होईल असा प्रश्न विचारल्यावर मिटकरी म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात आले तर ते स्वतः याबाबतची घोषणा करतील. तुम्ही प्रसारमाध्यमं ज्या प्रकारच्या बातम्या दाखवत आहात त्याप्रमाणे जर दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामार्फत झालं असेल तर आज अमित शाह स्वतः त्याबाबतची घोषणा करतील. आज ते निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात येत आहेत आज ते घोषणा करतील व त्यानंतरच्या दोन-तीन दिवसांत शपथविधी होईल. परंतु, महायुतीला तूर्तास शपथविधीची घाई वाटत नाही. आमच्या माहितीप्रमाणे १ डिसेंबर हीच तारीख ठरलेली आहे.