राज्यात सध्या मशिदींवरील भोग्यांचा विषय चांगलाच गाजत असून मनसैनिकांकडून हनुमान चालिसा लावत उत्तर दिलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. हनुमान चालिसा भोंग्यावर लावणाऱ्यांना स्वतःला तरी हनुमान चालिसा येते का? अशी विचारणा करत त्यांनी स्टेजवरुनच हनुमान चालिसा म्हणून दाखवली. इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा पार पडली. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे उपस्थित होते.
हनुमान चालिसा पाठ असली पाहिजे. भाजपावाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये, आम्हाला पाठ आहे. हनुमान चालिसा भोंग्यावर लावणाऱ्यांना स्वतःला तरी हनुमान चालिसा येते का? असा प्रश्न उपस्थित करुन मिटकरी यांनी हनुमान चालिसा बोलून दाखवलली. यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना भाषणादरम्यान थांबवत हनुमान स्तोत्र म्हणण्यास सांगितलं असता त्यांनी तेदेखील म्हणून दाखवलं.
अमोल मिटकरी यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.