विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० तारखेला निवडणूक होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर या निवडणुका बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलं आहे. त्यातच महत्त्वाच्या राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावं जाहीर केली जात असताना उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांकडून नाराजी देखील वर्तवली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक ट्वीट करत भाजपाला लक्ष्य केलं आहे.
भाजपाची यादी जाहीर, दिग्गजांना वगळलं
भाजपाकडून आज पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा समावेश नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपाकडे अपक्ष आणि इतर छोटे पक्ष यांची ताकद लक्षात घेता भाजपाची संख्या ही ११३ पर्यंत सहज जाते. मात्र भाजपा यापेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करत आला आहे. याच दाव्यावर भाजपाने पाचवा उमेदावर विधानपरिषद निवडणूकीत उतरवला आहे. तेव्हा महाविकास आघाडीकडे जाणाऱ्या किंवा तटस्थ रहाण्याची शक्यता असलेल्या छोटे पक्ष, अपक्ष आमदारांना आपल्या बाजुला वळवण्याचे आव्हान भाजपापुढे असणार आहे.
मात्र, असं असलं, तरी ज्या नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्या नावांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी खोचक ट्वीट केलं आहे. “सर्वसामान्यांचे कैवारी विनायकराव मेटे, केशव उपाध्ये, विनोद तावडे आणि सदाभाऊ खोत यांच्यावर झालेला अन्याय आम्ही कदापी सहन करु शकत नाही. त्यांच्या या अतीव दुःखात आम्ही सहभागी आहोत. आई भवानी त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो”, असं मिटकरींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापू लागलं आहे.