पालिका निवडणूक रायगड
सोयीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी आणि शेकापची झालेली आघाडी, घरातच झालेल्या बंडखोरीमुळे मेटाकुटीला आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्ह्य़ाच्या राजकारणात एके काळी पगडा असलेल्या शेकापला सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्यात आलेले अपयश, भाजप वा शिवसेनेची मर्यादित ताकद या पाश्र्वभूमीवर प्रस्थापितच पुन्हा सत्ता कायम राखतील, अशी चिन्हे आहेत. शेकाप आणि राष्ट्रवादीपुढे मात्र आव्हान उभे ठाकले आहे.
रायगड जिल्ह्य़ातील नऊ नगरपालिकांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. सध्या पाच नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी, दोन नगरपालिकांमध्ये काँग्रेस तर शेकाप आणि शिवसेना-भाजप युती प्रत्येकी एका नगरपालिकेत सत्तेत आहे. हाच कल कमी-अधिक प्रमाणात कायम राहील, अशी चिन्हे आहेत. मात्र गेल्या पाच वर्षांत जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात राजकीय उलथापालथी झाल्याने साऱ्याच प्रस्थापित राजकीय पक्षांना आपआपली शक्तिस्थळे कायम राखण्याचे आव्हान आहे.
तटकरेंना घरातूनच आव्हान
रोह्य़ात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या व्याह्य़ाला उमेदवारी दिल्याने पुतण्याने बंडाचे निशाण रोवले. पुतण्या शिवसेनेच्या वतीने रिंगणात असल्याने तटकरे यांना सारी ताकद व्याह्य़ाच्या विजयासाठी खर्ची करावी लागत आहे. आमदार पुतण्याही विरोधात गेल्याचे चित्र आहे. रोहा गमविल्यास तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसू शकेल. शेकाप आणि राष्ट्रवादी हे पारंपरिक प्रतिस्पर्धी, पण दोघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. यामुळेच दोन्ही पक्ष जुने वाद पोटात घालून एकत्र लढत आहेत. रायगडच्या ग्रामीण भागात शेकापची ताकद असली तरी शहरी भागात ती मर्यादित आहे. शहरी भागात तर शेकापला सर्व प्रभागांमध्ये उमेदवारही सापडले नाहीत.
राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजपला रायगडमध्ये अजूनही हातपाय पसरता आलेले नाहीत. आधी शेकाप, नंतर काँग्रेस व आता भाजप असा प्रवास केलेल्या रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर या निर्वासितांवरच भाजपची भिस्त आहे. भाजपने राष्ट्रवादीतील बंडखोरांना पावन करून घेतले. त्यात पेणमध्ये तर वादग्रस्त नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. भाजपने स्थानिक पातळीवर सोयीस्कर आघाडय़ा करण्याचा प्रयत्न केला आहे. अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने काँग्रेसशी जुळवून घेतले आहे, तर पेणमध्ये शेकापशी युती केली आहे. जिल्हय़ात दोन खासदार आणि दोन आमदार असले तरी शहरी भागात शिवसेनेची फार ताकद नाही. मात्र या वेळी सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. महाड अपवाद वगळता सेनेने भाजपशी युती केलेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे व अशोक चव्हाण, राष्ट्रवादीत सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे तर शिवसेनेत अनंत गीते यांनी प्रचाराची सारी धुरा सांभाळली आहे. स्थानिक प्रश्न आणि विकासकामांच्या मुद्दय़ाबरोबरच हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय, पेण अर्बन बँकेचा प्रश्न, मराठा आरक्षण, सामाजिक विषमता, शेकाप-राष्ट्रवादी आघाडी, भ्रष्टाचार यांसारखे मुद्दे प्रचारानिमित्ताने चच्रेत आले आहेत. जिल्हय़ात एकत्र आलेले सुनील तटकरे व जयंत पाटील या दोघांना सेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आव्हान दिले आहे