राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अपात्रता प्रकरणाच्या याचिकेवर १३ ऑक्टोबरला एकत्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज ( १० ऑक्टोबर ) सुनावणी पार पडली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं १३ ऑक्टोबरला सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे.
आमदार अपात्रतेस विधानसभा अध्यक्षांकडून होत असलेल्या विलंबाबत शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर नोव्हेंबर महिन्यात सुनावणी होणार होती. पण, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी १३ ऑक्टोबरला एकत्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
हेही वाचा : “…हे कायद्याचं अज्ञान आहे”, अजित पवार गटाच्या ‘त्या’ मागणीवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान
याबद्दल प्रसारमाध्यमांशी दिल्लीत संवाद साधताना वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले, “सरन्यायाधीशींनी ठाकरे गट प्रकरणात विधानसभा अध्यक्षांकडून रूपरेषा मागवली आहे. सुनील प्रभूंच्या याचिकेवर नोव्हेंबर महिन्यात सुनावणी होणार होती. पण, १३ ऑक्टोबरला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडेल.”
हेही वाचा : “एखादा निर्णय घटनाबाह्य असेल, तर…”, राहुल नार्वेकर यांचं विधान
“सर्वोच्च न्यायालयात जयंत पाटीलांकडून कपिल सिब्बल, तर अजित पवार गटाकडून मुकूल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर हे मुख्य आहेत. शुक्रवारी दोन्ही प्रकरण सर्वोच्च न्यायालय ऐकेल,” अशी माहिती सिद्धार्थ शिंदेंनी दिली.