छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याची फूस होती, असा खळबळजनक दावा भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. या दंगलीतील प्रमुख आरोपी, रियाजुद्दीन आणि मौलाना कादीर यांचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत. कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची त्यांना फूस होती, हे तपासलं पाहिजे, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला.
अनिल बोंडे यांच्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना मिटकरी यांनी अनिल बोंडेंवर सडकून टीका केली. अनिल बोंडे ही एक व्यक्ती नसून ती विकृती आहे. अनिल बोंडे ही बाहेरून जितकी विषारी व्यक्ती आहे, तितकीच आतून विषारी व्यक्ती आहे, अशी जहरी टीका अमोल मिटकरी यांनी केली.
छत्रपती संभाजीनगरमधील दंगल राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत होती, या अनिल बोंडेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी म्हणाले, “अनिल बोंडे ही एक व्यक्ती नसून ती एक विकृती आहे. अमरावती शहरामध्ये ज्या व्यक्तीने दंगली भडकवण्याचं पाप केलं, ती व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत आहे. ही व्यक्ती किती विकृत आहे? हे सर्व अमरावतीकरांना माहीत आहे.”
हेही वाचा- “शुभ बोल रे नाऱ्या”; ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाईंचं टीकास्र, म्हणाले…
“दुसरं मला असं सांगायचंय की, अनिल बोंडे बाहेरून जितकी विषारी व्यक्ती आहे, तितकीच आतून विषारी व्यक्ती आहे. त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही. अनिल बोंडे ही व्यक्ती नाही, मी त्यांना खासदार म्हणूनही पाहत नाही. ज्यांनी आजपर्यंत जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं पाप केलं आहे. त्यामुळे अमरावतीकरांना माहीत आहे की, ही विकृती आहे. तसेच मागच्या शिवजयंतीला एका शिवव्याख्यात्याने अनिल बोंडेंना त्यांची लायकी दाखवली आहे. त्यामुळे अनिल बोंडेंची कुवत आणि लायकी तितकीच आहे,” असा टोलाही अमोल मिटकरींनी लगावला.