राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब, चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार उदय सावंत उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी भास्कर जाधव चार्टड विमानानं औरंगाबादला पोहोचले.

भास्कर जाधव आज शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणारा असून यामुळे शिवसेनेची ताकद मात्र वाढणार आहे.

ऑगस्ट अखेरला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत पक्षात मिळत असलेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली होती. “शरद पवार यांनी पुष्कळ दिले. पण, पक्षांतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त आहे. भारतीय जनता पक्षात मी जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू इच्छित नाही. शिवसेनेचा पर्याय खुला आहे,” असे सागंत शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले होते.

“माझं म्हणणं मी लिखित स्वरूपात शरद पवार साहेबांकडे दिले आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतरच मी राष्ट्रवादी सोडली आहे. ९ जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत आहेत. तसेच गुहागर पंचायत समिती आणि ७३ सरपंच माझ्यासोबत आहे”, असे भास्कर जाधव यांनी सांगितले होते.

Story img Loader