लोकसभा निवडणुकांसाठी सध्या देशभरात प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. महाराष्ट्रातही काहीसं असंच चित्र दिसत असून उमेदवारी जाहीर होताच संबंधित नेतेमंडळी प्रचाराच्या कामाला सुरुवात करताना दिसत आहेत. अगदी तीन दिवसांपूर्वी पक्षप्रवेश आणि त्याच्या काही क्षणांत उमेदवारी जाहीर झालेल्या अर्चना पाटील यांनीही अशाचप्रकारे प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, अर्चना पाटील यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंधाच्या बार्शी विधानसभा मतदारसंघात अर्चना पाटील आल्या असता माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.
नेमकं काय घडलं?
तीन दिवसांपूर्वी अर्थात ४ एप्रिल रोजी अर्चना पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्याच्या काही क्षणांत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आज अर्चना पाटील बार्शीमध्ये आल्या असताना एबीपी माझाशी बोलताना त्यांनी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाल्या अर्चना पाटील?
अर्चना पाटील यांनी यावेळी आपलं प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेसला नसून महायुतीला असल्याचं सांगितलं. बार्शीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फारसा प्रभाव दिसत नसताना इथे पक्षाचं वर्चस्व कसं वाढवणार? अशी विचारणा केली असता अर्चना पाटील म्हणाल्या, “मी कशाला वाढवू? मला तर काही कळतच नाही. मी महायुतीची उमेदवार आहे. मी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि एनडीए ४०० पार करण्यासाठी निवडणूक लढवत आहे”, असं त्या म्हणाल्या.
आमदार राजेंद्र राऊत यांच्याविषयी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या, “राजेंद्र राऊत महायुतीचे घटक आहेत. माझे पती स्वत: भाजपाचे आमदार आहेत. मला त्यांनी इथून तिकीट दिलं आहे. मी इथे भगवंताच्या दर्शनासाठी आले आहे. मी निवडून येणार आहे. राजेंद्र राऊत यांचा मला भावासारखा पाठिंबा आहे. त्यामुळे इथे माझा पक्ष म्हणजे महायुतीच वाढणार आहे”, असं त्या म्हणाल्या.
कोण आहेत अर्चना पाटील?
धाराशिव मतदारसंघावरून महायुतीमध्ये बरीच चर्चा झाल्याचं समोर आलं होतं. २०१९ साली तत्कालीन शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी इथे निवडणूक जिंकली होती. त्यामुळे शिंदे गटाकडून या जागेवर दावा सांगण्यात आला होता. मात्र, शेवटी जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात पडली. राणा जगजितसिंह पाटील व ओमराजे निंबाळकर या दोन कुटुंबांमध्ये जिल्ह्यात नेहमीच चढाओढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निंबाळकरांविरोधात पाटील कुटुंबातच उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यासाठी त्यांनी ४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेशही केला. त्यामुळे या मतदारसंघात पाटील विरुद्ध निंबाळकर हा परंपरागत सामना या निवडणुकीतही पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.