काँग्रेस आघाडीत विधानसभेचा नगर शहर मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळेल अशी खात्री व्यक्त करून पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यासाठी महापौर संग्राम जगताप यांची उमेदवारीही रविवारी जाहीर केली. नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत लगेचच एकसंघपणे निवडणुकीच्या तयारीला लागण्याचाही निर्णय घेण्यात आला.
पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांच्या पुढाकाराने त्यांच्याच अध्यक्षतेखाली रविवारी ही बैठक झाली. पक्षाचे सर्व व मनपात पक्षाला पाठिंबा दिलेल्या अपक्ष नगरसेवकांसह आमदार अरूण जगताप, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, डॉ. रावसाहेब अनभुले, शरद क्यादर, शरद रच्चा, प्रा. अजीज आंबेकर आदी यावेळी उपस्थित होते.
नगर शहराची जागा गेल्यावेळी काँग्रेसकडे गेली आहे, ती आता पुन्हा राष्ट्रवादीलाच मिळेल अशा विश्वास कळमकर यांनी या बैठकीत सुरूवातीलाच व्यक्त केली. स्थानिक पदाधिकारी व कार्यक्तर्यानी पूर्वीच पक्षश्रेष्ठींकडे भावना व्यक्त केल्या असून त्यांनीही त्यादृष्टीने हिरवा कंदील दिला आहे अशी माहिती कळमकर यांनी बैठकीत दिली. नगर शहरातील उमेदवारीसाठी महापौर संग्राम जगताप यांची उमेदवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे निश्चित केली आहे. स्थानिक पातळीवरील हा एकमुखी निर्णय असून त्यादृष्टीनेच सर्व गटतट बाजूला ठेऊन सर्वजण एकत्र आले आहेत असे ते म्हणाले.
बैठकीनंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना कळमकर यांनी सांगितले की, नगर शहराची जागा राष्ट्रवादीच्याच वाटय़ाला येईल. मात्र काँग्रेस, आघाडीतील या निर्णयास विलंब होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर, उमेदवारी मिळूनही प्रचारात पिछाडीवर रहावे लागेल, त्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. हा धोका लक्षात घेऊनच स्थानिक पातळीवर तयारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागच्या काही निवडणुकांमधील चूक आता सुधारणार असून उमेदवारीचा निर्णय एकमुखी करून एकसंघपणेच या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. लवकरच पक्षाच्या अन्य आघाडय़ा, पदाधिकारी कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन ही तयारी सुरू करू असे कळमकर म्हणाले. दरम्यान नगरसेवक व जगताप गटाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अन्य पदाधिकाऱ्यांना मात्र त्याची निमंत्रणे नव्हती असे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा