वाई : मुंबई बाजार समितीतील काही तक्रारीवरून तांत्रिक माहितीच्या आधारे सातारा लोकसभेचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदें यांच्यावर नव्याने गुन्हा नोंदविण्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार स्वतः शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात दिली.
यावरून शरद पवार आज साताऱ्यात आक्रमक झाले. दहिवडी येथे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी यावर शासनाला इशारा दिला.शशिकांत शिंदे यांना निवडणुकीत अडविण्याचा व थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या विरोधात आवाज उठवून संघर्ष करतील, असा इशारा त्यांनी दिला.या वेळी त्यांनी मुंबई मार्केट समितीतील तक्रारीवरून शशिकांत शिंदेंना त्रास देण्याचा प्रकार महायुतीतील भाजपकडून सुरू आहे. याबाबत भाष्य केले.
हेही वाचा…माढा आणि साताऱ्यातून लाखाच्या मताधिक्याने जिंकू, शरद पवार यांचा दावा
शरद पवार म्हणाले,शशिकांत शिंदे आणि त्यांचे काही सहकारी मुंबई मार्केट समितीत चांगले काम करत आहेत. त्या मार्केट समितीत काही तक्रारी झाल्या आहेत. त्या मार्केट कमिटीत अतिशय उत्तम काम करणारे पानसरे नावाचे संचालक यांना अटक केली आहे.
हेही वाचा…“पंतप्रधान मोदी विश्वनेते, कुणीही नाद करायचा नाही”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा
शशिकांत शिंदेंवरही गुन्हा नोंदवून काहीही करून त्यांना अडवत निवडणुकीतून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर खटला दाखल केला आहे. आता त्यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. सातारा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या विरोधात आवाज उठवून संघर्ष करतील असा इशारा खासदार शरद पवार यांनी दिला आहे.