सातारा-सांगली मतदार संघ; ३८ कोटींच्या मालमत्तेचे धनी; काँग्रेसच्या कदम यांची सव्वा पाच कोटीची मालमत्ता
चारचाकी, दुचाकीसह ५९ वाहने, ४३ तोळ्याचे सुवर्णालंकार, विविध ठिकाणी जमिनी, भूखंड अशी ३८ कोटी ८६ लाखांची मालमत्ता आणि विविध पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेले १२ गुन्हे अशी ओळख घेऊन राष्ट्रवादीचे शेखर गोरे सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधानपरिषदेसाठी निवडणुक मदानात उतरले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे मोहनराव कदम यांची मालमत्ताही सव्वापाच कोटींच्या घरात आहे.
उमेदवारी दाखल करीत असताना उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांच्या नावे स्थावर मालमत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण व शहरी भागात जमिनी व भूखंड असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्याकडे व पत्नीकडे ४३ तोळ्याचे सुवर्णालंकार, चारचाकी व दुचाकीसह ५९ वाहने आहेत, मात्र त्याचबरोबर विविध बँका व वित्तीय संस्थांचे ९ कोटी ५६ लाख ७९ हजारांचे कर्जही आहे.
दरम्यान, या संपत्तीसह त्यांच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल झाल्याचेही त्यांनी नमूद केलेले आहे. या गटातील विद्यमान आमदार प्रभाकर घाग्रे यांची मालमत्ता २५ कोटी १७ लाख, अपक्ष असलेले नगरसेवक शेखर माने यांनी स्वत: व पत्नींच्या नावे ३ कोटी २५ लाखांची मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. याशिवाय डमी उमेदवारी दाखल केलेले राष्ट्रवादीचे अरुण लाड यांची मालमत्ता ७६ लाख रुपये आहे.