लोकसभा निवडणूक झाल्यापासून आणि खासकरुन महाराष्ट्रातले निकाल समोर आल्यापासून छगन भुजबळ यांचं नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांत जी विधानं केली आहेत त्यावरुन ते नाराज झाले आहेत का? या चर्चा रंगत आहेत. अशात छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरेंनी टीका केली होती. बाळासाहेब ठाकरेंना ज्या माणसाने अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले असं राज ठाकरे भाषणात म्हणाले होते. त्याबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरेंना छगन भुजबळांनी महत्त्वाचा सवाल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले आहेत छगन भुजबळ?

“मी विरोधी पक्षनेता होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली.बाळासाहेबांनी माझ्यावर टीका केली. माझ्यासमोर जी फाईल आली ती फाईल होम डिपार्टमेंट म्हणून माझ्याकडे आली. त्याआधी अगोदर शिवाजी पार्कवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की, श्रीकृष्ण कमिटीचा जो अहवाल आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करु. त्यानंतर मी कारवाई केली होती. माझ्यापुढे तेव्हा मार्गच नव्हता. ” असं छगन भुजबळ म्हणाले तसंच राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेखही त्यांनी केला.

हे पण वाचा- अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ नाराज आहेत?; उत्तर देत म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो..”

राज ठाकरेंना छगन भुजबळांचा प्रश्न

“मी राज ठाकरेंना विचारु इच्छितो की राज ठाकरे लहान होते तेव्हा शाळेतून आले नाहीत की बाळासाहेब विचारायचे राजा अजून कसा आला नाही? माँ विचारायच्या राजा का आला नाही? राज ठाकरे घरी आल्याशिवाय माँ आणि बाळासाहेब हे दोघंही जेवत नव्हते. रक्ताचं नातं आहे. माझे आणि बाळासाहेबांचे तर मतभेद झाले. मंडल आयोग किंवा इतर कशावरुन. पण राज ठाकरेंचं काय? तुमचे मतभेद कशावरुन झाले? मतभेद झाले तरीही तुम्ही हे लक्षात घ्यायचं होतं की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. मग तुम्ही वेगळं व्हायचं कारण काय? तुमची काय मागणी होती सांगा लोकांना. मतभेद होते तरीही सांभाळून घ्यायला नकोत? बाळासाहेबांना किती दुःख झालं असेल की ज्याला मी लहानपणापासून सांभाळत होतो त्याने असं करावं हे त्यांना वाटलंच असेल.” असं भुजबळ म्हणाले. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी हे भाष्य केलं.

राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केली

यापुढे भुजबळ म्हणाले, “राज ठाकरेंनी मनसे पक्ष काढला तो पुढचा भाग. शिवसेना सोडून त्यांनी चूक केली. एकमेकांवर टीका झाली. शिवसेना आणि राज ठाकरेंवर किती टीका टिपण्णी झाली. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सांगितलं असतं की हे नाही तर ते काम कर. त्यांनी (राज ठाकरे) ऐकायचं होतं. “

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा मी दोघांनाही फोन केला आणि बोललो की पाच ते सहा दिवस एकमेकांविरोधात काहीही बोलू नका. राग हा त्या क्षणापुरता असतो, राग शांत झाला की मन बदलतं. दोघांनीही ऐकलं पण मतभेद झाले आणि राज ठाकरेंनी त्यांचा निर्णय घेतल्याचं भुजबळ यांनी सागितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chhagan bhujbal ask question to mns chief raj thackeray about what disagreement with balasaheb thackeray tell people scj