भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर सुरु झालेला वाद अद्याप थांबताना दिसत नाही आहे. इस्लामिक देशांकडून नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुपूर शर्मा म्हणजे भारत नव्हे असं सांगताना छगन भुजबळ यांनी इस्लामिक देशातील लोक सहकार्य करतील अपेक्षा प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
Maharashtra News Live : महाराष्ट्रासह देशभरातील क्षणोक्षणीचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
“कोणत्याही धर्मगुरूविरोधात बोललं जाऊ नये, अपमानकारक बोललं जाऊ नये, प्रत्येक धर्माचा आदर राखला गेला पाहिजे हे आपल्या संविधानात लिहिले आहे. आता जे कुणी धमक्या देत आहेत त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, हे भारताने केलेले नाही. हे भारतातील एका पक्षाच्या कार्यकर्त्याने केले आहे. त्याची शिक्षा इतर भारतीयांना नको,” असं भुजबळ म्हणाले आहेत.
“एखाद्या पक्षात असे माथेफिरू लोक असतात. केवळ प्रसिद्धी मिळावी त्यासाठी काहीजण करत असतात. त्या नुपूर म्हणजे भारत नव्हे…त्या एका पक्षाच्या लहान प्रवक्ता आहेत. त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यामुळे अरब इस्लामिक देशातील लोक सहकार्य करतील,” असंही छगन भुजबळ म्हणाले.