राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंबधी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील नायक होते असं विधान केल्याने त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. काँग्रेस, शिवसेना तसंच काही संघटनांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही राज्यपालांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राज्यपाल अशी वेगवेगळी वक्तव्यं का करत आहेत हे कळत नाही. शिवाजी महाराज जुने झाले असतील तर मोदींना त्यांची प्रतिमा होर्डिंगवर लावून ‘सबका साथ, सबका विकास, छत्रपतींचा आशीर्वाद’ असं का लिहावं लागतं?,” असा प्रश्न छगन भुजबळांनी विचारला आहे.

औरंगाबाद: राज्यपाल कोश्यारींच्या विधानावरून नवा वाद

“महाराष्ट्रात फार सोशिकता आहे हे त्यांना सांगायला हवं. इतर राज्यात जर असं काही झालं असतं तर अख्खं राज्य पेटून उठलं असतं. राज्यात राज्यपालांचा मान राखला जात आहे. मग राज्यापालांनीसुद्धा तितकंच जबाबदारीने विधान केलं पाहिजे. राज्यपालांनी सगळ्या गोष्टींचा विचार करावा,” असा सल्ला भुजबळांनी दिला आहे.

हेही वाचा – “…नाहीतर जोडे काय असतात आणि कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा इशारा!

“शिवाजी महाराजांची तुलना कृपया कुणाशीही करु नका. तुम्ही प्रथम नागरिक आहात, सांभाळून बोला. काहीही वक्तव्यं करून लोकांना उकसवू नका. जगभर महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. अफजलखानाला पत्रं पाठवणे ही शिवाजी महाराजांची रणनीती होती,” असं यावेळी भुजबळांनी सांगितलं.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

‘‘तुमचा आदर्श कोण आहे, असं जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरं दिली जात असत. परंतु महाराष्ट्रात मात्र तुम्हाला तुमचे आदर्श अन्यत्र शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील नायक आहेत,’’ असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात शनिवारी केलं. या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना सन्माननीय डी. लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली.

वक्तव्य काय?

“महाराष्ट्रात मात्र तुम्हाला तुमचे आदर्श अन्यत्र शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील नायक आहेत,” असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chhanagn bhujbal on maharashtra governor bhagat singh koshyari statement over chhatrapati shivaji maharaj sgy