राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोपरगावमधील दौ-याच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या पक्षाच्या बैठकीकडे जिल्ह्य़ातील सर्वच प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली. पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचा जिल्हा मेळावा ५ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे निर्माण झालेला असंतोष व्यक्त करण्यासाठी मेळाव्याचा उपयोग केला जावा अशी अपेक्षा पदाधिकारी आपल्या भाषणातून व्यक्त करत होते. मात्र त्यासाठीही कार्यक्रम ठरवला गेला नाही. प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग व माजी आमदार अशोक काळे यांनीच तालुकानिहाय दौरे करून नियोजन करण्याचे जाहीर केले.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, मोदी केवळ घोषणा करत आहेत, अंमलबजावणी करताना दिसत नाहीत, दूध धंदाही कोलमडला आहे, धनगर आरक्षणावरही सरकार घूमजाव करत आहे, निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने शेतकरी पुन्हा पवार यांच्याकडे आशेने पहात आहे, सरकारविरोधी असंतोषाचा उपयोग राष्ट्रवादीने करुन घेतला पाहिजे, पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन अभंग यांनी केले. जि.प.चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनीही याच मुद्यावर भर दिला. माजी आमदार काळे यांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापनेवेळीच आम्ही प्रवेश करणार होतो, मात्र कोल्हे यांनी प्रवेश केल्यामुळे आपण थांबलो, परंतु शंकरराव काळे व आपणही पवारनिष्ठच आहोत, असे स्पष्ट केले. माजी आमदार भानुदास मुरकुटे, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. मेधा कांबळे आदींची भाषणे झाली.
आ. संग्राम जगताप, आशुतोष काळे, दादा कळमकर, जि.प. अध्यक्ष मंजूषा गुंड, सभापती शरद नवले व नंदा वारे, कैलास वाकचौरे, सुनील गडाख, विठ्ठलराव लंघे, घनश्याम शेलार, सोमनाथ धूत, अशोक बाबर, कपिल पवार तसेच तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते. महापौरपदी निवड झाल्याबद्दल अभिषेक कळमकर यांचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader