उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी ( २३ सप्टेंबर ) केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ‘आज माझ्याकडं अर्थखात असल्यानं आपल्याला झुकतं माप मिळालं आहे. पण, पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाष्य केलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी म्हटलं, “आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखात आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथे चूका होत असतील, तर दुरूस्त केल्या पाहिजेत.”
हेही वाचा : “अपात्रतेबाबतच्या कारवाईसाठी लागेल तेवढा वेळ घेणार”, नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले…
यावर जयंत पाटील म्हणाले, “अजित पवार सावध असल्याचं मला समाधान आहे. अजित पवार स्वखुशीनं सरकारमध्ये सामील झाले आहेत. अन्याय होत असल्यास अजित पवार विचार करतील.”
हेही वाचा : “अजित पवारांमध्ये डावललं जात असल्याची भावना”, खडसेंच्या विधानाला महाजन प्रत्युत्तर देत म्हणाले…
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “भविष्याचं कुणालाच काही माहिती नसतं. त्यामुळे अजित पवार यांचं वक्तव्य नैसर्गिक आहे. हे राजकीय विधान नाही,” असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.