राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीवरुन झालेलं राजकारण आणि आरोप प्रत्यारोप रंगलेले असतानाच गुलाबराव पाटील आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी रेल्वेच्या एकाच डब्यातून प्रवास केला आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रेल्वेच्या डब्यातून एकत्र प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. या दोघांचे फोटोही समोर आले आहेत. त्यामुळे आता विविध चर्चा होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १६ जूनच्या दिवशी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. अमळनेर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीर आणि कार्यशाळेचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते केलं जाणार आहे. गुरुवारी शरद पवार हे मुंबईहून रेल्वे गाडीत बसले. त्याच डब्यात शिंदे गटाचे नेते आणि जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटीलही होते. या दोघांच्या एकत्र प्रवासाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
गुलाबराव पाटील यांनी याबाबत काय म्हटलं आहे?
“आज योगायोगाने शरद पवार यांच्यासह प्रवास करण्याची संधी मिळाली. पाणी टंचाई, कृषी समस्या आणि इतर विषयांवर चर्चा झाली. त्यांनी समस्या जाणून घेतल्या, आनंद वाटला. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. शरद पवार हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसंच एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं आपण ऐकलं पाहिजे” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.