आज पुण्यात ‘पुणे डॉक्टर असोसिएशन’च्या वतीने ‘सिंगल डॉक्टर फॅमिली’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. ज्या कुटुंबांनी स्त्री जन्माचा आदर केला. ज्यांनी वंशाचा दिवा म्हणून मुलाची अपेक्षा न करता केवळ मुलीवर कुटुंब नियोजन केलं, अशा कुटुंबांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित राहिल्या. दरम्यान, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केवळ एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केल्यावर कोणता सामना करावा लागला असं विचारलं असता शरद पवारांनी मन जिंकणारं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मला फारसा काही सामना करावा लागला नाही. पण काही वेळा विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. एकदा निवडणुकीनिमित्त एका गावात गेलो होतो. यावेळी एका वयोवृद्ध व्यक्तीने विचारलं, तुम्हाला एकच मुलगी आहे, उद्या अचानक काही झालं तर अग्नी कोण देणार? तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला एकच मुलगी आहे आणि मला अजिबात काळजी नाही. लोकांना अग्निची चिंता आहे, ही गोष्ट मला काही मान्य नाही. हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं, असं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे.

हेही वाचा- पुणे : बापाचा अंदाज सुप्रियाने चुकवला शरद पवार यांची कबुली

‘जिवंत असताना मुलीशी नीट वागण्याची चिंता करायची की मेल्यावर चितेला अग्नी कोण देणार याची चिंता करायची?’, असा प्रश्न मी त्यांना विचारायचो, असेही पवार म्हणाले. दिलेले काम नेमकेपणाने पार पाडणे हे मुली चोखपणे करतात. आरक्षण दिल्यानंतर ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचा ५० टक्के कारभार महिलांच्या हाती आला आहे. लोकांची कामे होतात आणि भ्रष्टाचार होत नाही, हा अनुभव आहे. मुली वैमानिक असल्याने विमान अपघात कमी झाले, याकडे लक्ष वेधून पवार म्हणाले, महिलांचे नेतृत्व स्वीकारावे याबाबत उत्तर भारताची मानसिकता दिसत नाही. उत्तम काम करेल या मानसिकतेतून महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. राजकीय मतभेद झाले तरी आपल्या कर्तृत्वाने देशाची मन उंचावण्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले हे वास्तव आहे. संधीची समानता असली पाहिजे. कर्तृत्वाची मक्तेदारी केवळ पुरुषांकडे नाही. कर्तृत्व आहे हे इंदिरा गांधीं यांच्यासह अनेक महिलांनी सिद्ध केले, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा- “…म्हणून मंत्र्यांनी अद्याप सूत्रं हाती घेतली नाहीत” नवीन सरकारमधील नाराजीनाट्याबाबत धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले…

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमात इतरही अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार ‘खूप स्ट्रॉंग’ आहेत, असं सांगितलं आहे. शिवाय माझ्या आईकडे खूप सयंम आहे. त्यांच्या सयंमामुळेच बहुदा त्यांचा संसार इतका काळ टिकला आहे. मी आईकडून संयम घेतला आहे, अशी मिश्किल टिप्पणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chief sharad pawar and supriya sule interview single doctor family pune rmm