राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा स्थितीतही त्यांनी आज शिर्डी येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ते कार्यकर्त्यांना सविस्तरपणे संबोधित करू शकले नाहीत. त्यांनी आपलं भाषण थोडक्यात उरकलं. उर्वरित भाषण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं. प्रकृती ठीक नसूनही ते शिर्डी येथे सुरू असलेल्या मंथन शिबिराला उपस्थित राहिले.
यावेळी केलेल्या भाषणात शरद पवार म्हणाले की, मी सगळ्यांची भाषणं ऐकली नाहीत, पण काही भाषणं ऐकण्याची संधी मिळाली. सध्या मी एवढंच सांगू इच्छितो की, आज मला सविस्तर बोलणं शक्य नाही. कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसा सल्ला दिला आहे. आणखी १० ते १५ दिवसांनी मला नेहमीचं काम करता येईल, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पण या शिबिरातीन एक संदेश जात आहे की, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने हा पक्ष मजबूत करणार आहे. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यामध्ये आहे, ही संधी लवकरच मिळेल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.
हेही वाचा- “…तो हमने भी जख्म नही गिने” राजकारणाची लढाई मैदानात लढा म्हणत छगन भुजबळांची टोलेबाजी
एवढं बोलून शरद पवारांनी अवघ्या काही मिनिटांत आपलं भाषण आटोपतं घेतलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांचं उर्वरित भाषण वाचून दाखवलं. प्रकृती ठीक नसतानाही शरद पवारांनी या मंथन शिबिराला हजेरी लावली. पण यावेळी अजित पवार मात्र गायब असल्याचं चित्र दिसलं.