समाजात काही लोक प्रतिगामी विचार पसरवण्याचे काम करीत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राजस्थान येथील न्यायालयाबाहेर मनुचा पुतळा उभारण्यात आला आहे. या सर्व प्रकारातून कोणते विचार पोहोचविण्याचे काम एक घटक करीत आहे. हे सर्वानी लक्षात ठेवण्याची गरज असून हा मनुवाद संपविण्यासाठी महात्मा फुले यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी यावेळी केले.
समता भूमी महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथीनिमित्त माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांना माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्र, मानचिन्ह, फुले पगडी, उपरणे आणि रोख एक लाख रुपये देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, समाजात एका विचाराचे वातावरण असताना महात्मा फुले यांनी शिक्षणाचा आणि आधुनिकतेचा प्रसार करण्याचे काम केले आहे. हे आजच्या अनेक उदाहरणातून सांगता येईल. तसेच प्रत्येकाने शेती करू नये, शेतकर्यांनी जोड धंदा देखील करावा, असे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या विचारावर आज आपण काम करत असल्याचे पवारांनी नमूद केले.
तर छगन भुजबळ यांनी देखील संभाजी भिडेंवर निशाणा साधला. देशात मनुवाद वाढवण्याचे काम चालू असून माझ्या बागेतील आंबे खा म्हणजे तुम्हाला मुले होतील असा प्रचार केला जात आहे. यातून कोणते विचार समाजात रुजवण्याचे काम केले जात आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.
ते पुढे म्हणाले की, आम्ही काही दहा हजार कोटी किंवा पाच हजार कोटी महात्मा फुले स्मारकासाठी मागत नाही. तर काही लाख रुपये मागत असून तसे झाल्यास स्मारक अधिक चांगले प्रकारे होईल. महात्मा फुलेवाडा हे माझे ऊर्जा केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आजवर अनेक व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले असून आज शरद पवार यांना गौरवण्यात येत आहे. त्यांना गेल्याच वर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. पण त्यांनी समितीला सांगितले होते की छगन भुजबळ बाहेर आल्यावरच हा पुरस्कार स्वीकारणार. यानुसार त्यांनी आज (बुधवारी) पुरस्कार स्वीकारला.