सध्या देशात बसलेल्या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काही घेणंदेणं नाही. सध्याच्या घडीला न परवडणारी स्थिती ही शेतीची झाली आहे. कष्टकरी, मजूर, कामगार हा सगळा वर्ग अडचणीत आहे आणि या सरकारला त्याविषयीची चिंता नाही असं म्हणत शरद पवार यांनी आज मोदी सरकारवर टीका केली. बीडमध्ये झालेल्या सभेत शरद पवार यांनी हे भाष्य केलं. आपल्या भाषणात शरद पवार यांनी मणिपूरला मोदी का गेले नाहीत? असा प्रश्नही विचारला आहे.
काय म्हणाले आहेत शरद पवार?
कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे जबाबदारी केंद्र सरकारची असते. आज मणिपूरची अवस्था काय आहे? मणिपूर, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्यं आहेत पण ही महत्त्वाची राज्यं आहेत. प्रत्येक राज्याच्या शेजारी पाकिस्तान तरी आहे किंवा चीन तरी आहे. या दोन्ही देशांची नजर चांगली नाही. संकट आलं तर काय होईल तिथून काय होईल यासाठी भारतीय लष्कराला सतर्क रहावं लागतं. मणिपूर हे सध्या अशांत आहे. आज मणिपूर पेटलं आहे. समाजा-समाजात भांडण झालं, अंतर पडलं. एक वर्ग विरुद्ध दुसरा वर्ग असा तिढा निर्माण झाला. तिथे हल्ले होत आहेत, उद्योग नष्ट केले जात आहेत. स्त्रियांची धिंड काढली जाते आहे. हे सगळं होत असताना देशात बसलेलं भाजपाचं सरकार कुठल्याच प्रकारची पावलं टाकत नाही, असं शरद पवार म्हणाले.
हे पण वाचा- अजित पवार माईंड गेम खेळत आहेत का? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…
मणिपूरकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ढुंकूनही पाहिलं नाही
मणिपूरमधल्या भगिनींची दुर्दशा झाल्यानंतर आणि त्यांची घरदारं पेटवल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथल्या समाजातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी मणिपूरला जाणं आवश्यक होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही. असा आरोप शरद पवार यांनी केला. संसदेचं अधिवेशन सुरु झालं तेव्हा फक्त तीन मिनिटं ते मणिपूरवर ते बोलले. अविश्वास ठराव आल्यानंतर चार ते पाच मिनिटं बोलले. मात्र तिथल्या भगिनींचं दुःख हे देशाच्या पंतप्रधानांनी समजून घेतलं नाही. आज ही स्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते. ही स्थिती बदलायची असेल तर वेगळा विचार करावा लागेल असं शरद पवार बीडमधल्या सभेत म्हणाले.
हे पण वाचा Sanjay Raut: “तुम्ही तुमचे फोटो लावून मतं मागा”, संजय राऊताचं अजित पवार गटावर टीकास्त्र
शरद पवार बीडमध्ये दाखल झाले तेव्हा जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. तसंच शरद पवार हे जेव्हा स्टेजवर आले तेव्हा देश का नेता कैसा हो?, शरद पवार जैसा हो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार! या घोषणा देण्यात आल्या. बीडमधल्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.