मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी या ठिकाणी सभा घेतली. राज ठाकरेंनी आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. तसंच शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावरही भाष्य केलं. अजित पवार ज्या प्रकारे वागत होते ते पाहूनच बहुदा शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला असा टोला राज ठाकरेंनी अजित पवारांना लगावला. तसंच शरद पवारांच्या तोंडून कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
२०१४ ला भाजपाचं सरकार राज्यात आलं. त्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना, तेव्हा कुणाच्या तरी डोक्यात खूळ आलं. अरबी समुद्रात शिवछत्रपतींचं स्मारक बांधायचं. त्यानंतर मी काय बोललो? ते राहिलं बाजूला आणि या सगळ्या एनसीपीच्या लोकांनी पसरवायला सुरूवात केली की राज ठाकरे शिवछत्रपतींचं स्मारक बांधायला विरोध करतो आहे. राज ठाकरे शिवछत्रपतींचं स्मारक बांधायला विरोध करेन का?
शरद पवारांवर टीका
जो पक्ष, ज्या पक्षाचा अध्यक्ष ज्यांनी परवा दिवशी राजीनामा दिला आणि आत्ता असलेला. या माणसाच्या तोंडातून म्हणजे शरद पवार यांच्या तोंडून कधीही शिवछत्रपतींचं नाव येत नव्हतं. त्यांची भाषणं काढून बघा तुम्ही. शाहू, फुले आंबेडकर हीच नावं. ते मोठे होतेच त्याबद्दल काही वाद नाही. त्यांची नावं घेतलीच पाहिजे पण सर्वप्रथम आमच्या शिवछत्रपतींचं नाव घेतलं पाहिजे ती आमची ओळख आहे. आम्ही कोण आहोत तर आम्ही मराठी आहोत. मराठी म्हणजे कोण? महाराष्ट्रात राहणारे, म्हणजे आमच्या शिवछत्रपतींच्या भूमित राहणारे असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझी बदनामी केली
शिवछत्रपतींचं नाव शरद पवार घेत नव्हते. त्यांनी पसरवायला सुरुवात केली की राज ठाकरे कसा शिवछत्रपतींच्या स्मारकाला विरोध करतो आहे. किती पुतळे आहेत महाराजांचे महाराष्ट्रात? जयंती आणि पुण्यतिथीला हार घालण्यापुरतंच आपलं कर्तव्य उरतं. शिवछत्रपतींनी जे उभं केलं आहे त्यातलं आपण पुढच्या पिढीला काय दाखवणार आहोत? त्यामुळे मी म्हटलं होतं की शिवछत्रपतींचा पुतळा समुद्रात उभा करणार, त्याला १० हजार कोटी रुपये खर्च करणार त्यापेक्षा महाराजांचे गड-किल्ले दुरुस्त करा. हे बोलणारा एकटा मी होतो. लोकांना वाटलं माझा स्मारकाला विरोध आहे. माझा स्मारकाला विरोध नाही. मात्र छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले हीच खरी स्मारकं आहेत. पुढच्या पिढ्यांना काय पुतळे दाखवणार का? त्यामुळे मी बोललो होतो. इतकं वैविध्य असलेलं आपलं कोकण इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवेल. पण कोणाला काही घेणं देणं नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच सत्ताधाऱ्यांना या गोष्टीशी घेणंदेणं नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.