राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेली बैठक नुकतीच पार पडली आहे. मागील दोन तासांपासून ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. शरद पवार साडेसहा वाजता मातोश्रीवर दाखल झाले होते. ८ वाजून २० मिनिटांनी ते मातोश्रीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली.
खरंतर, कालपासून शरद पवार यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी देखील ‘शिवसेना’ आणि ‘ठाकरे’ नावाचा वापर न करता जगून दाखवा, असं आवाहन केलं आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेतल्याने पुढे काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं होतं. पण शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचं बंड मोडून काढलं होतं. त्यानंतर आता गुरुवारपासून शरद पवारांनी शिवसेनच्या बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दुसरीकडे, आज सकाळी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात झालेल्या बैठकीनंतर राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “हम हार माननेवाले नही है! विधानसभेत मतदान झालं तर तिथे जिंकू, लढाई रस्त्यावर झाली तर तिथेही जिंकू, ज्यांना आमचा सामना करायचा आहे, त्यांनी मुंबईत येऊन सामना करावा, या लोकांनी खूप चुकीचं पाऊल उचललं आहे. परत येण्याची संधी त्यांना आपण दिली होती. पण आता वेळ निघून गेली आहे. आता मुंबईत आमचं त्यांना आव्हान असेल,” असंही राऊत म्हणाले.