‘मोदी की गॅरंटी है’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर दिल्लीतील भाजपा मुख्यालयात केलेल्या भाषणातून लोकसभा निवडणुकांचं बिगुल फुंकलं. त्यामुळे आता देशभरात भाजपाच्या स्थानिक व राष्ट्रीय नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘मोदी की गॅरंटी’ म्हणत प्रचार केला जात आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टिप्पणी केली आहे. त्यांच्या धोरण मांडणीवर शरद पवारांनी हल्लाबोल केला. शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिरातून त्यांनी भाजपावर टीकास्र सोडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांनी यावेळी भाजपाचं धोरण फसवं असल्याची टीका केली. “देशात आज अस्वस्थता आहे. भाजपा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात सत्ता आहे. आक्रमक प्रचारयंत्रणा त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केली आहे. त्यातून जसं हिटलरच्या जर्मनीतील गोबेल्स नीतीची चर्चा होते, त्याचप्रमाणेत असत्यावर आधारित अनेक गोष्टी जनमानसात पसरवण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे. त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत”, असं शरद पवार म्हणाले.

“आपलं सरकार आल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली सही…”, सुप्रिया सुळेंचं आश्वासन; म्हणाल्या, “माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा”

“सध्या देशातलं चित्र भाजपाला अनुकूल नाही. त्यामुळे केरळमध्ये आज कम्युनिस्ट व काँग्रेसचं राज्य आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये भाजपा नाही. काही ठिकाणी भाजपा आहे पण स्वत:च्या ताकदीवर नाही. गोव्यात आमदार फोडून तिथे भाजपा सत्तेत आली. तीन राज्यांच्या निवडणुका होण्याआधी मध्य प्रदेशमध्ये आमदार फोडून तिथे भाजपानं सत्ता मिळवली. त्यामुळे भाजपाला देशात अनुकूल असं वातावरण नाही. अनेक कार्यक्रम जाहीर करून त्याची अंमलबजावणीच न करून लोकांची फसवणूक करण्याचं काम भाजपानं केलं आहे”, अशी टीका शरद पवारांनी यावेळी केली.

“मोदी संसदेत क्वचित येतात, पण जेव्हा…”

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्र सोडलं. “मोदी संसदेत क्वचितच येतात. पण जेव्हा येतात तेव्हा एखाद्या धोरणाची मांडणी अशी करतात की संसदेतले सदस्यही काही वेळासाठी थक्क होतात. घोषणा खूप करतात. २०१६-१७ या काळातला अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला. त्यात सांगितलं की २०२२ पर्यंत देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल. आता २०२४ आलंय. पण काहीच घडलं नाही. एकदा मोदींनी संसदेत सांगितलं की २०२२ पर्यंत शहरी भागातल्या लोकांना पक्की घरं दिली जातील. पण ही घोषणा हवेतच राहिली. मोदी सांगतात गॅरंटी आहे. पण ती काही खरी नाही. त्याचा अनुभव अनेकदा आला आहे”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

लोकसभेतील घुसखोरी प्रकरणावर भूमिका

“संसदेत काही लोक घुसले. ते घुसून काहीतरी मागणी करत होते. नंतर सभागृह बंद झालं. त्यावर आमच्या खासदारांनी पंतप्रधानांनी किंवा गृहमंत्र्यांनी संसदेला यासंदर्भात आढावा माहिती द्यावी. पण त्याला परवानगी दिली गेली नाही. विरोधी पक्षांच्या आग्रही भूमिकेचा परिणाम १४६ खासदारांच्या निलंबनात दिसून आला”, असंही शरद पवारांनी सांगितलं.