राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट घेतली आहे. या गुप्त भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून शरद पवारांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, अजित पवारांबरोबरच्या बैठकीनंतर शरद पवारांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. आपण कुठेही जाणार नाही. वडिलकीच्या नात्याने अजित पवारांना भेटलो, असं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं असलं तर महाविकास आघाडीमध्ये अद्याप काही प्रमाणात संभ्रम कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सर्व घडामोडींनंतर शरद पवार आज (१७ ऑगस्ट) बीडमध्ये जाहीरसभा घेणार आहेत. या सभेतून शरद पवार नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेतून शरद पवार आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडतील, अशी शक्यता आहे. तसेच ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातही बोलण्याची शक्यता आहे. या सभेआधीच शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

खरं तर, बीड येथील शरद पवारांच्या सभेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बीडमध्ये सभा घेणार आहेत. याबाबत विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, अशी सभा घेण्याचा त्यांना (अजित पवार) अधिकार आहे. पण ज्या जिल्ह्यात ते सभा घेत आहेत. त्या जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत एका महिलेने केलेल्या आरोपाचा इतिहासही ते जमलेल्या लोकांना आवर्जून सांगतील, असं म्हणत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना टोला लगावला होता. त्यामुळे या सभेतून धनंजय मुंडे चेकमेट होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा- “कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे…”, शरद पवारांच्या बीडमधील सभेवरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा

दुसरीकडे, शरद पवारांच्या बीड येथील सभेवरून धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “कोण कुणाला कोंडीत पकडतंय, ते येणारा काळ ठरवेल”, असं विधान धनंजय मुंडेंनी केलं. त्यामुळे शरद पवार नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून दुपारी एक वाजता सभा सुरू होणार आहे. सभेच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४० पेक्षा जास्त बैठका घेण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- ‘कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या!’ अजितदादांसाठी बॅनर झळकवत धनंजय मुंडेंची शरद पवारांना भावनिक साद

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्यावर या सभेची जबाबदारी सोपण्यात आली आहे. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात ही सभा होणार असून दहा हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. शरद पवार, आमदार रोहित पवार, राजेश टोपे, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडणार आहे. दरम्यान सभेत भाषणातून नेमकं शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chief sharad pawar rally in beed will criticise ajit pawar faction dhananjay munde rmm